नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची महिनाभरापूर्वी भरदिवसा स्थानिक राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यातील मारेकरी महिना लोटूनही पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा तसेच या प्रकरणाच्या खटल्यात जेष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी नियुक्ती व्हावी याकरिता बियाणी कुटुंबीयांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली जाणार आहे.
मृत संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी ‘लाेकमत’ला ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पती संजय बियाणी यांच्या खुनाला ५ मे राेजी एक महिना पूर्ण झाला आहे; मात्र अद्याप पाेलिसांना या प्रकरणाचा छडा लावता आलेला नाही. या खुनाचा तपास थेट सीबीआयकडे द्यावा, अशी आमची मागणी आहे. न्यायासाठी आम्ही औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहाेत. पुढील आठवड्यात याचिकेची ही कार्यवाही पूर्ण केली जाईल. संजय बियाणी यांच्या खुनाचा तपास हाेऊन खटला न्यायालयात चालेल तेव्हा सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जावी, अशीही विनंती आम्ही सरकारसाेबतच उच्च न्यायालयालाही करणार असल्याचे अनिता बियाणी यांनी स्पष्ट केले. येथील भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीसुद्धा खुनाच्या घटनेनंतर लगेच दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली हाेती व बियाणींच्या खुनाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली हाेती.
५० तज्ज्ञ पाेलीस अधिकारी तपासातनांदेड पाेलिसांनी बियाणींच्या खुनाच्या तपासासाठी अपर पाेलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपासातील ‘एक्सपर्ट’ म्हणून ओळखले जाणारे सुमारे ५० अधिकारी, कर्मचारी या एसआयटीत काम करीत आहेत. नांदेड परिक्षेत्राचे पाेलीस उपमहानिरीक्षक निसार तांबाेळी स्वत: या तपासावर लक्ष ठेवून आहेत.