नांदेड- येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या (Sanjay Biyani Murder Case) प्रकरणात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी गुरुवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली. या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीवर मुंबईतून लक्ष ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
5 एप्रिल रोजी शारदा नगर भागात घरासमोर बियाणी यांची दोघांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. बुधवारी बियाणी यांच्या कुटुंबातील सदस्यांशी चव्हाण यांनी विशेष पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या समवेत खाजगीत भेट घेतली होती.
त्यानंतर गुरुवारी मंत्री मंडळ बैठकीनंतर गृहमंत्री वळसे पाटील आणि महासंचालक यांची भेट घेतली. घडलेली घटना धक्कादायक असून बियाणी यांचे मारेकरी आणि त्यामागील सूत्रधार शोधण्यासाठी सुरू असलेल्या तपासावर मुंबईतून लक्ष ठेवावे. तसेच आरोपींना लवकर अटक करावी अशी मागणी केल्याचे चव्हाण म्हणाले