नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी भरदिवसा गाेळ्या घालून हत्या (Sanjay Biyani Murder Case ) करण्यात आली हाेती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (विशेष तपास पथके) स्थापन करण्यात आली असून, या पथकांनी पाच पैलूंवर तपास चालविला आहे. दरम्यान, पोलिसांनी रेकॉर्डवरील ४५ गुन्हेगार तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. तसेच पोलिसांची पथके परप्रांतातही रवाना झाली आहेत.
पाेलीस सूत्रांनी सांगितले की, अप्पर पाेलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे एसआयटीचे नेतृत्व देण्यात आले आहे. या एसआयटीमध्ये परिक्षेत्रातील गुन्हे उघडकीस आणण्यात तज्ज्ञ असलेल्या पाेलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात खंडणी, व्यावसायिक स्पर्धा, गुंतवणूक, रियल इस्टेट यासारखे अनेक मुद्दे पुढे येत आहेत. या सर्व मुद्द्यांची प्राथमिक पडताळणी पाेलिसांकडून केली जात आहे.
या प्रकरणात तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी आणखी किमान ४८ तास लागणार आहेत. त्यानंतरच तपास वेगाने पुढे जाईल. एसआयटीसाेबतच संबंधित पाेलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा हे सुद्धा समांतर तपास आपल्या स्तरावर करीत आहेत. सर्व शक्यता पडताळून पाहताना, पाेलिसांची पथके लगतच्या जिल्ह्यातच नव्हे, तर तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतही गेली आहेत. मात्र, खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतरच आराेपींचा शाेध घेण्याचा मार्ग सुकर हाेणार असल्याचे सांगण्यात आले.
९ एमएम काडतुसाचा वापरसंजय बियाणी यांच्या खुनासाठी वापरलेले पिस्टल व त्यातील काडतूस हे ९ एमएम आकाराचे असल्याचे सांगितले जाते. नांदेडमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारच्या पिस्टलचा वापर करण्यात आला आहे. ही शस्त्रे मुंबईमध्ये सहज उपलब्ध हाेत असल्याचेही सांगण्यात आले.
रेकाॅर्डवरील ४५ गुन्हेगार ताब्यातसंजय बियाणी यांच्या हत्येनंतर मंगळवारी रात्री पाेलिसांनी नांदेड शहरात काेम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात रेकाॅर्डवरील यासंबंधीच्या गुन्ह्यांशी कनेक्ट तब्बल ४५ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चाैकशी केली जात आहे.