नांदेड - नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर ( Sanjay Biyani Murder Case Nanded) आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी बियाणी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. नांदेडच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.
चव्हाण म्हणाले, नांदेडच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली असावी. अशा प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली. मी घटनेचे व्हिडिओ बारकाईने पाहिले. मी काल मुंबईत होतो, आज तातडीने नांदेडला आलो. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास अंत्यत बारकाईने होणार आहे. मारेकरी आणि त्यामागील सूत्रधार कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.
तपासावर स्वतः लक्ष ठेवणार तसेच संजयच्या जाण्याने सर्वांचेच नुकसान झाले आहे. गरिबीतून पुढे आलेला संजय अंत्यत मनमिळाऊ, शांत होता. काही दिवसांपूर्वी मला त्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले होते.तपासावर आपण लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे कुणीही हे प्रकरण सहजपणे घेऊ नाही. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मी पोलिसांची बैठक घेणार आहे. त्यांनी आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती घेणार आहे, असेही चव्हाण म्हणाले.