नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खुनामागे (Sanjay Biyani Murder ) कुख्यात गुंड रिंधा याचा हात नसावा, अशा प्राथमिक निष्कर्षाप्रत पाेलीस आले आहेत. मात्र, तपासाचा हा मुद्दा पाेलिसांनी अद्याप साेडलेला नाही.
संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतर आठवडा लाेटला तरी पाेलिसांच्या हाती अद्याप ठाेस काही लागलेले नाही. प्रमुख दाेन - तीन मुद्द्यांवर तपास केला जात आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच गुंड रिंधा याचे नाव चर्चिले जाऊ लागले. या अनुषंगाने उच्चपदस्थ पाेलीस अधिकाऱ्याने ‘लाेकमत’ला सांगितले की, गुंड रिंधा याची पार्श्वभूमी, गुन्ह्याची पद्धत लक्षात घेता बियाणी प्रकरणात रिंधा नसावा, असे दिसते. नांदेडमध्ये प्रत्येक माेठ्या घटनेमागे रिंधाचे नाव पुढे करण्याचा जणू पायंडा पडला आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नाही. मात्र, पाेलिसांनी रिंधा हा बियाणी खून प्रकरणातील तपासाचा अँगल अद्याप साेडलेला नाही. दाेन राज्यांत हा तपास केंद्रीत केला गेला आहे. त्यापैकी एका राज्यात पाेलीस पथक गेले असून, दुसऱ्या राज्यात लवकरच जाणार आहे. बियाणी यांच्या निकटवर्तीय मित्रांवरही तपासाचा एक फाेकस आहे. त्यांच्यात भांडण असले तरी ते खुनासारख्या टाेकाच्या निर्णयापर्यंत जातील, असे वाटत नसल्याचे सांगण्यात आले.
धमकी आलेल्या पाच व्यापाऱ्यांना पोलीस सुरक्षा बियाणी यांच्या खून प्रकरणादरम्यान नांदेड शहरातील आणखी चार ते पाच व्यापाऱ्यांना धमक्या आल्या. त्यांना पाेलीस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी सतत त्यांच्या संपर्कात आहेत. पुन्हा फाेन आल्यास ताे कसा हॅंडल करायचा, याबाबत या व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र, पाचही व्यापाऱ्यांना आलेले फाेन हे संजय बियाणी यांच्या खुनाच्या घटनेनंतरचे आहेत. खुनानंतर निर्माण झालेल्या भीतीचा काहीतरी फायदा करून घेण्याच्या उद्देशाने हे फाेन काॅल केल्याचे स्पष्ट हाेते. खुनापूर्वी एक-दाेन काॅल आले. मात्र, ते पुन्हा आले नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बियाणी कुटुंबीयांचा असहकार पण टिका जोरातया पाेलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पाेलीस तपासात बियाणी कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्याऐवजी ते पाेलिसांवर टीका करण्यात धन्यता मानतात. या कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्यास पाेलीस तपासाला गती येऊन मदतच हाेईल. अजूनही वेळ गेलेली नाही, बियाणी कुटुंबीयांच्या सहकार्याची, त्यांनी काही सांगण्याची पाेलिसांना प्रतीक्षा आहे.
खरे तेच समोर येईलसंजय बियाणी खून प्रकरणात गुन्हा तातडीने उघडकीस यावा म्हणून पाेलिसांवर सरकार, प्रशासन, जनता व विविध स्तरांतून दबाव आहे. मात्र, हा दबाव झुगारून पाेलीस यंत्रणा काम करीत आहे. दबाव आहे म्हणून प्रकरणात कुणालाही अथवा चुकीच्या लाेकांना अडकविले जाणार नाही. थाेडा वेळ लागला तरी चालेल, टीका-दबाव सहन करू. पण, खऱ्या गुन्हेगारांनाच अटक केली जाईल. लवकरच पाेलीस बियाणींच्या खुन्यांना अटक करतील, असा विश्वास या उच्च पदस्थ पाेलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला.