'संजय शिरसाठांना ठाकरेंच्या सेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही'; आता चव्हाणांनी वर्तवले भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 11:58 AM2023-04-04T11:58:21+5:302023-04-04T11:59:33+5:30
संजय शिरसाठ यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपत जातील, असे वक्तव्य केले होते. त्याचा चव्हाणांनी कठोर शब्दात समाचार घेतला.
नांदेड : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ हे काही भविष्यकार नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज मला वाटत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शिरसाठांना आता मंत्रिमंडळात घेणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने त्यांना परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही, असे माझे भाकीत असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.
शिरसाठ यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपत जातील, असे वक्तव्य केले होते. त्याचा चव्हाणांनी कठोर शब्दात समाचार घेतला. यावेळी महाविकास आघाडीच्या सभेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडल्याच्या विषयावर चव्हाणांनी टीका केली. राजकारणात खालच्या स्तरावर जाऊन जे सुरू आहे, ते अतिशय चुकीचे आहे. सभेचे ठिकाण हे सार्वजनिक आहे. कोणालाही तेथे सभा घेण्यापासून रोखले नाही. तुमच्या सभा झाल्या म्हणजे आम्हीही गोमूत्र शिंपडायचे का? तुम्हाला तुमची वैचारिक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, जे कृत्य करत आहात ते लोकांना आवडत आहे, असे जर वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे.
तर बावनकुळेंच्या ‘बदला घेतला’ या वक्तव्याचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. राजकारणात बदल्याची भाषा कोणीही वापरू नये, कारण बदल्याऐवजी लोकशाहीने सर्व चालत आहे. पक्षांतर बंदी कायदा आहे, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर काही बंधने आहेत. नीतीमूल्य आहेत. त्यामुळे आपण जे करता आहात ते समर्थनीय आहे का? असा सवालही चव्हाण यांनी केला. तसेच ज्यांच्याकडे बहुमत त्यांनी सरकार बनवावे, आम्ही कधी अशी बदल्याची भाषा केली नाही, असेही चव्हाण म्हणाले.