बिलोली तालुक्यातील रुद्रापूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच अर्जुन शेळके व बाबा शेळके यांच्या गटाचे पाच सदस्य येथे निवडून आले होते. नुकतीच सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. ९ सदस्यीय येथील ग्रामपंचायतीत नलगोंडे गटाचे ४ सदस्य निवड प्रक्रियेत गैरहजर राहिल्याने माजी सरपंच बाबा शेळके गटाच्या त्यांच्याच सूनबाई महानंदाबाई शेळके ह्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर कविता दोरणेवाड ह्या उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी एस. एम. वाघमारे यांनी केली. सभागृहात नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य राजू गायकवाड, माधव शेळके, लक्ष्मीबाई शेळके आदींची उपस्थिती होती, तर शेषाबाई नलगोंडे, कमलाकर जमदडे, पवन गिरी अन्य एक सदस्य सभागृहात गैरहजर होते. वाघमारे यांना ग्रामसेवक पी. डी. वाघमारे, तलाठी एम. एस. राजकुंडल यांनी सहकार्य केले तर पोलीस उपनिरीक्षक सय्यद, बिट जमादार जी. बी. शिंदे , पो. काॅ. निम्मलवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सरपंच शेळके व उपसरपंच दोरणेवाड यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजू गायकवाड, माधव शेळके, लक्ष्मीबाई शेळके यांचा सत्कार माजी सरपंच व पॅनल प्रमुख बाबा शेळके व अर्जुन शेळके यांनी केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची रुद्रापुरात फटाक्यांच्या आतषबाजीत विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे.
रुद्रापूर येथे सरपंच शेळके गटाचे पुन्हा वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:17 AM