सरपंच ते खासदार! वसंत चव्हाण यांची १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज
By शिवराज बिचेवार | Published: August 26, 2024 08:36 AM2024-08-26T08:36:15+5:302024-08-26T08:38:57+5:30
मंगळवारी सकाळीं ११ वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत
नांदेड- नांदेडचे काँगेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हैद्राबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. १४ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मृत्यू समयी ते ७० वर्षाचे होते. तब्बल २४ वर्ष सरपंच,एक वेळेस विधानं परिषद सदस्य, दोन वेळेस विधानसभा आमदार ते आता खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. त्यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
१५ ऑगस्ट १९५४ रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाले.1987 साली ते नायगाव चे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 24 वर्ष ते या पदावर होते. 1990 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 2002 मध्ये राष्ट्रवादी पक्षकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहचले.2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये काँग्रेस कडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस ला मरगळ आली होती.
यावेळी काँग्रेसकडून सक्षम चेहऱ्याचा शोध सुरू होता. पक्षाने अखेर वसंतराव याना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. भाजपच्या तोडीची प्रचार यंत्रणा नसताना वसंतराव यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा 50 हजारावर मतांनी पराभव केला. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी मिळाली होती. परंतु प्रकृतीच्या कारणाने वसंतराव यांना काही मर्यादा येत होत्या.
त्यातच 13 ऑगस्ट रोजी त्यांना नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याच दिवशी एअर ॲम्बुलन्सने त्यांना हैदराबादला हलविण्यात आले होते. 14 दिवसाच्या उपचारा नंतर त्याचे सोमवारी पहाटे निधन झाले.आज दुपारी तीन वाजता त्यांचे पार्थिवदेह नायगाव येथे आणले जाणार आहे . मंगळवारी सकाळीं 11 वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
खासदार वंसत चव्हाण यांची राजकीय कारकीर्द:
- जन्म - 15 ऑगस्ट 1954
- 1987 साली नायगाव ग्राम पंचायतीचे सरपंच , 24 वर्ष सरपंच
- 1990 - जिल्हा परिषद सदस्य
- 2002 विधान परिषद सदस्य ( राष्ट्रवादी )
- 2009 - विधानसभा सदस्य - अपक्ष
- 2014 - विधानसभय सदस्य - काँगेस
- 2024 - लोकसभा सदस्य - काँगेस