नांदेड : सातबारा उताऱ्यावर काही फेरफार केली आहे ? मालमत्ता पत्रिकेवर फेरफार नोंदवण्यासाठी अर्ज केलाय ? तुमचे हे प्रकरण रखडले आहे का ? थांबा, आता तुम्हाला याबाबत कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुमच्या प्रकरणाचे ट्रॅकिंग आता ऑनलाइन करता येणार आहे. एखाद्या टेबलावर हे प्रकरण प्रलंबित असल्यास ऑनलाइनच समजणार आहे. या सुविधेमुळे तहसील किंवा तलाठी सज्जा कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही.आपली चावडी या भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर सातबारा उतारा, मिळकत पत्रिका तसेच मोजणीच्या प्रकरणांमधील प्रलंबितता याबाबत ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून सातबारा उतारा, मिळकत पत्रिका तसेच मोजणीच्या प्रकरणांमधील प्रलंबितता दिवस कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ही ऑनलाइन योजना सुरू केली आहे.
सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिकेत फेरफार केल्यानंतर त्याला मान्यता मिळून सुधारित सातबारा किंवा मिळकत पत्रिका आपल्या हातात येईपर्यंत या प्रकरणाची विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जाते. त्यानंतर त्याला मान्यता मिळते. ही ऑनलाइन सुविधा असल्याने अर्जदाराला घरबसल्याच आपल्या प्रकरणाचे ट्रॅकिंग करता येणार आहे. सध्या सातबारा व मिळकत पत्रिकेतील फेरफार नोंदी संदर्भातील सुविधा आहे. लवकरच जमीन मोजणी प्रक्रियेतील सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपले प्रकरण नेमके कोणत्या टेबलावर किती दिवस रखडले ? याची माहिती सामान्यांना मिळाल्यानंतर तो संबंधिताला याविषयी विचारणा करू शकेल. यामुळे सामान्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. एखादे प्रकरण कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे, हे केवळ वरिष्ठ अधिकारी यांनाच कळू शकत होते. मात्र, आता ही सुविधा सामान्यांसाठीही उपलब्ध करून दिली आहे. सातबारा उताऱ्यातील फेरफार नोंद केल्यानंतर त्यासंदर्भातील नोटीस काढणे, हरकतीची तारीख निश्चित करणे, हरकती आल्याची नोंद करणे व संबंधिताने त्यावर सुनावणी घेऊन त्याला मान्यता देणे, अशा टप्प्यांमधून हे प्रकरण जाते. या प्रकरणाचा प्रवास आता तारखेनुसार संकेतस्थळावर दिसणार आहे.सातबारा फेरफार सहज उपलब्ध
आपली चावडी संकेतस्थळावर फेरफार, खरेदी विक्री व्यवहार, वारस नोंदी आदेश, मोजणी नोटीस, हक्कसोडपत्र, बक्षीस पत्र इत्यादी ऑनलाइन पाहण्यास भेटणार आहे. आपली चावडी सातबार पाहण्यासाठी आपल्याला ऑनलाइन संकेतस्थळाची मदत घ्यावी लागेल. या ठिकाणी आपण आपली चावडी ई- फेरफार पाहू शकतो. जुने फेरफार नोंद वही सहजासहजी पाहता येईल.
आता बोर्डावर नोटीस लावण्याची गरज नाही
पूर्वी एखादा व्यवहार करायचा असेल तर गावामध्ये दवंडी दिली जात असे. ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर नोटीस छापली जात असे. जेणेकरून भविष्यात एखाद्या व्यवहाराविषयी कुणाला हरकत असेल तर ती करता यावी, यासाठी हे सर्व केले जात असे. शेतजमिनीचे व्यवहार एकमेकांसोबत झाले असतील तर त्यासाठी प्रशासनाला नोटीस जाहीर करावी लागते. ही नोटीस आपण आपली चावडीच्या मदतीने ऑनलाइन पाहू शकतो. हरकत नोंद करू शकतो. शेतीमध्ये दोन व्यक्तीसोबत व्यवहार झाले असतील तर आपली चावडी फेरफार ऑनलाइन जाहीर करते.
१५ ते ३० दिवसांत फेरफार लागतोतलाठ्याने फेरफार नोंदविले ते या डिजिटल नोटीस बोर्डवर नागरिकांना पाहायला मिळतात. त्यावर आक्षेपही नोंदविता येते. यामुळे कामात पारदर्शकता येणार असून, तलाठी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही.-स्वप्नील दिघलवार, निवासी नायब तहसीलदार, नांदेड.