उपमहापौरपदी सतीश देशमुख बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:32 AM2019-06-21T01:32:35+5:302019-06-21T01:33:19+5:30
महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सतीश देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
नांदेड : महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सतीश देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. २४ जुन रोजी ही निवड प्रक्रिया होणार आहे.
महापालिकेच्या उपमहापौर पदाचा विनय गिरडे यांनी राजीनामा दिला. काँग्रेसच्या सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर आणि उपमहापौरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. १ जून रोजी महापौर पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. उपमहापौरपदाची निवडणूक २४ जून रोजी होणार आहे.
या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा २० जून ही शेवटची मुदत होती. या मुदतीत गुरुवारी काँग्रेसचे सतीश देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार देशमुख यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी दिक्षा धबाले, सभापती फारुख अली खान, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, नागनाथ गड्डम, संजय मोरे आदींची उपस्थिती होती. २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा घेतली जाणार आहे. या सभेत निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे.
पाटील-देशमुख स्पर्धेत देशमुख ठरले वरचढ
उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून सतीश देशमुख यांच्यासह प्रशांत तिडके पाटील यांचे नाव आघाडीवर होते. लोकसभा निवडणुकीत पाटील- देशमुख हा मुद्दाही महत्वाचा ठरला. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने देशमुखांना उपमहापौर पदाची संधी दिल्याचे सांगितले जात आहे. या सर्व स्पर्धेत प्रशांत तिडके मागे राहिले. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचाच आदेश नांदेडमध्ये अंतिम आहे.