शिवराज बिचेवार
नांदेड : राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील धान्य घोटाळ्याचा भांडाफोड पोलिसांनी अगोदर सर्व पुरावे गोळा करून केला होता. त्यासाठी अनेक दिवस पोलीस कर्मचारी वेशांतर करून कंपनीवर पाळत ठेवून होते. कंपनीत जाणारे धान्य शासकीय वितरण व्यवस्थेतील असल्याची पूर्णपणे खात्री पटल्यानंतर १८ जुलै २०१८ रोजी कंपनीवर धाड मारण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या सूक्ष्म तपासामुळे काळाबाजार करणारी मोठी साखळी उघडी पडली.
तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना शासकीय धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. एफसीआयच्या गुदामातून निघालेले धान्य हे इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीत नेण्यात येत होते. सर्वप्रथम मीणा यांच्या पथकाने कृष्णूर रस्त्यावरील कहाळा टोलनाक्यावरून सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. त्यात १२ जुलै ७ ट्रक, तर १६ जुलै रोजी ६ ट्रक गेल्याचे आढळून आले. कंपनीत जाणारे हे धान्य शासकीय असल्याची खात्री पटविण्यासाठी अनेक दिवस पोलीस कर्मचारी मजुराचे वेशांतर करून कंपनीवर पाळत ठेवून होते. जेवणासाठी धाब्यावर थांबलेल्या ट्रकचालकांकडूनही बोलण्यात त्यांनी बरीच माहिती गोळा केली होती. त्यामुळे पोलीस कारवाईसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. १८ जुलै २०१८ रोजी गुदामातून निघालेले धान्याचे दहा ट्रक कंधार, लोहा, मुखेड, हदगाव, माहूर आणि हिंगोलीकडे न जाता कृष्णूर मार्गावर धावत होते. पोलिसांनी लगेच या ट्रकचा पाठलाग करणे सुरू केले. या सर्व पाठलागाचे त्यांनी चित्रीकरणही केले. हे ट्रक इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीत जाताच पोलीस अधीक्षक मीणा यांचे पथक गुदामात धडकले. या ठिकाणी शासकीय धान्याचे जवळपास सहा हजार पोते आढळून आले. पोलिसांना महसूलला ही माहिती देऊन धान्याचे ट्रक जप्त केले होते. जप्त केलेले हे ट्रक पोलीस परेड ग्राउंडवर ठेवण्यात आले. परंतु अनेक दिवस महसूलच्या पथकाने या धान्याचा पंचनामाच केला नाही, तर दुसरीकडे गुदामातील धान्याची मोजदाद करण्यासाठीही चालढकल करण्यात आली. यावरून पोलीस आणि महसूलमध्ये त्यावेळी पत्रयुद्ध रंगले होते. महसूल विभागाकडून हा घोटाळा दडपण्याचाच अधिक प्रयत्न त्यावेळी झाला. परंतु खमक्या असलेल्या मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी घोटाळेबाजांची साखळी उघडी पाडली. या प्रकरणात पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा नोंदविला होता. त्यात कंपनीचे मालक अजय बाहेती, व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया, वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार, ललित खुराणा यांचा समावेश होता. आता हे सर्व जामिनावर तुरुंगातून बाहेर पडले आहेत. परंतु यातील अजय बाहेती यांना चार दिवसांपूर्वीच ईडीने अटक केली असून, त्यांना आठ दिवसांची कोठडी देण्यात आली. ईडीच्या एन्ट्रीने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
चौकट....
जुलै महिन्यात कंपनीत २७ ट्रक
जुलै या एकाच महिन्यात कंपनीत शासकीय धान्याचे २७ ट्रक गेले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि ट्रकला लावण्यात आलेल्या जीपीएसचे रेकॉर्ड पोलिसांनी तपासले होते. तर कंपनीत हे धान्य घेऊन आलेल्या ट्रकच्या नोंदी या पेन्सिलने, तर ट्रेडिंग कंपनीच्या ट्रकच्या नोंदी पेनने करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी दोन्ही ठिकाणची रजिस्टर जप्त करून पडताळणी केली होती.
प्रकरण विधानसभेपर्यंत
नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी विधानसभेत हे प्रकरण उचलून धरले होते. या प्रकरणाची त्यांनी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु त्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात गेले.
(फोटो क्रमांक - २८एनपीएच जेयुएन ०७.जेपीजी)