नांदेड : धर्म व अध्यात्मात फरक असून अध्यात्म म्हणजे सत्कार्य करणे व प्रेमाने, आनंदाने जीवन जगणे होय मनःशांतीसाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. विज्ञानामुळे परिस्थितीत तर अध्यात्मामुळे मन:स्थितीत बदल होत असतो. अध्यात्म व विज्ञान हे दोन्ही सत्याचा शोध घेतात, निसर्गाची जोडतात, मानवास मानवतेशी जोडतात. समाजाच्या कल्याणासाठी झटतात. या दोन्हीचा उद्देश सुख, शांती व संपन्नता आहे, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील महाविद्यालय विकास समिती सदस्य रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ. विजय भोसले यांनी केले.
ते श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात कै.डॉ. शंकररावजी चव्हाण व्याख्यानमालेअंतर्गत प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार झूम ऑनलाइन व्याख्यानात ‘अध्यात्म व विज्ञान’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले की, विज्ञान हे निरीक्षण, परीक्षण व चिकित्सेतून तर्कसंगत माहिती गोळा करते तर अध्यात्म स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेते. विज्ञानामुळे क्रांती होऊन भौतिकता वाढली; मात्र अध्यात्म मन:शांती, समाधान व आराम देते. विज्ञान शक्ती असून अध्यात्म भक्ती आहे. विज्ञान पुरुषार्थ असून अध्यात्म परमार्थ आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे म्हणाले की, आधुनिक काळात अध्यात्म व विज्ञानाला परस्परांपासून वेगळे करता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार अध्यात्म आहे. आज जीवन जगत असताना अध्यात्म व विज्ञानाचा आधार घेऊनच यशस्वी जीवन जगता येते. अध्यात्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले तर आभार प्रा. डॉ. विजयसिह ठाकूर यांनी मानले. व्याख्यानाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, प्रा.डॉ. अजय गव्हाणे, प्रा.डॉ. शबाना दुर्रानी, प्रा. डॉ. शिवराज शिरसाट आणि कार्यालयीन प्रबंधक श्री. संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.