नांदेड- पाच वर्षापूर्वी पाकिस्तानातून भारतात परत आलेली गीता सध्या आपल्या जन्मदात्यांचा शोध घेत आहेत. स्वंयसेवी संस्थेच्या सहकार्याने ती सोमवारी नांदेडात आली होती. त्यानंतर मंगळवारी तिला तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या धर्माबादसह बासर येथे नेण्यात आले होते. त्यातच नाशिक येथील एका दाम्पत्याने गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गीताला आता बुधवारी नाशिकला नेण्यात येणार आहे.
तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नातून पाच वर्षापूर्वी पाकिस्तानातून गीताला भारतात आणण्यात आले होते. दोन दशकापूर्वी गीताची तिच्या कुटुंबियांसोबत ताटातूट झाली होती. भारतात आल्यानंतर इंदूरमधील आनंद सेवा सोसायटीकडून तिची काळजी घेण्यात येत आहे. गिताच्या जन्मदात्याचा शोध घेण्यासाठी सोमवारी तिला नांदेडात आणले होते. तिने घरात इडली, डोसा हे पदार्थ बनवित असल्याचे तसेच ऊसाचे पीक गावात घेत असल्याची माहिती पथकाला हावभावावरुन दिली. त्यामुळे हे पथक मंगळवारी तेलंंगणाच्या सीमेवरील धर्माबाद आणि बासर येथे पोहचले होते.
या ठिकाणी गिताने रेल्वेस्टेशन आणि नदी पाहून आनंद व्यक्त केला. परंतु नदीजवळच मंदिर असल्याचे सांगितल्याने पथकाने नदीजवळ मंदिराचा शोध घेतला. परंतु बासर येथे नदी आणि मंदिर यांचे अंतर जास्त आहे. त्यामुळे पथकाची निराशा झाली. दरम्यान, आनंद सेवा सोसायटीकडून गिताच्या कुटुंबियाचा शोध घेण्यासाठी कौन बनेगा करोडपती या टिव्ही शोच्या माध्यमातून महानायक अमिताभ बच्चन यांना आवाहन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार या कार्यक्रमातून गीताबाबत आवाहन केल्यानंतर नाशिक येथील एका दाम्पत्याने गीता आपलीच मुलगी असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पथक आता गीताला नाशिक येथील त्या दाम्पत्याच्या घरी घेवून जाणार आहेत. या ठिकाणी सर्व बाजू पडताळून पाहिल्यानंतरच दावा करणारा व्यक्ती खरोखरच गीताचा पिता आहे काय? हे स्पष्ट होणार आहे.
नाशिकला नदीकाठी आहेत मंदिरेगीताने पथकाला दिलेल्या माहितीवरून नदीकाठी मंदिर असल्याचा उल्लेख आहे. त्यातच नाशिकच्या एका दाम्पत्याने गीताबाबत दावा केल्यामुळे आम्ही आता तिला नाशिकला घेवून जाणार आहोत. दावा केलेल्या व्यक्तीचे घर आणि आजूबाजूचा परिसर गीताला दाखविण्यात येणार आहे. अशी माहिती इंदूरचे ज्ञानेंद्र पुरोहित यांनी दिली.