नांदेड : निकृष्ट सोयाबीन बियाणाप्रकरणी मध्यप्रदेशातील सारस अॅग्रो कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा धर्माबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई कृषी विभागाच्यावतीने शुक्रवारी रात्री करण्यात आली़ नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात यापुर्वी इंदौर येथील कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे़
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हतबल झालेला आहे़ त्यातच महागामोलाचे बियाणे खरेदी करुन पेरणी केल्यानंतर बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत़ याबाबत संबंधित बियाणे कंपन्यासह विक्री करणाऱ्या दुकानदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी मागील काही दिवसांपासून लावुन धरली आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ विपीन इटकर यांनीही हा विषय गांभीर्याने घेत संबंधिताविरुद्ध कारवाईचे निर्देश दिल्यानंतर २९ जून रोजी नांदेड शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्यात इंदौर येथील एका कंपनीविरुोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल
त्यानंतर शुक्रवारी मध्यप्रदेशमधील खांडवा येथे कार्यरत असलेल्या मे सारस अॅग्रो इंडस्ट्रीज व क्षेत्रिय अधिकारी राजेंद्र बापुसाजी गुलकरी (यवतमाळ) यांच्या विरुद्ध पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास गोपाळराव अर्धापुरे यांनी फिर्याद दिली़ यावरुन शुक्रवारी रात्री धर्माबाद पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीसह बियाणे अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुलकरी यांनी सारस अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीसह इगल कंपनीने उत्पादिक केलेले सोयाबीनचे बियाणे आपल्या दुकानदारामार्फत विविध ठिकाणी विक्री केले होते़ या प्रकरणाचा अधिक तपास धर्माबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उजगरे हे करीत आहेत़
कृषी अधीक्षक कार्यालयाकडे १३४२ तक्रारीजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तब्बल १३४२ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत़ आधीचेच बियाणे कर्ज काढून घेतले़ आता पुन्हा बियाणांसाठी पैसे कुठून आणायचे असा पेच आता या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व १६ ही तालुक्यातून बियाणे न उगवल्याच्या तक्रारी असल्याने इतर कंपन्याविरुद्धही कृषी विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे़