नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, अवैध दारूसह इतर अवैध धंदे बोकाळले आहेत. याबाबतच्या तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक तांबोळी हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. ९ जुलैपासून चारही जिल्ह्यांत धाडसत्र सुरू आहे. पहिल्या दिवशी साडेतीनशेहून अधिक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १० जुलै रोजी ५८ मटका अड्डे, ७१ जुगार अड्डे, २३४ अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तब्बल २६५ कारवायांमध्ये ३३८ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २१ लाख ४९ हजार १४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत परिक्षेत्रातील १२५ पोलीस अधिकारी आणि ४९७ पोलीस अंमलदारांचा समावेश होता.
कारागृहातून सुटलेल्यांची झाडाझडती
ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत कारागृहातून सुटलेले १६६, दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी करणारे १६१, तडीपार, हद्दपार व नामचिन असलेल्या ५६ आरोपींच्या घरी जाऊन झाडाझडती घेण्यात आली. तसेच फरारी आणि पाहिजे असलेल्या १५८ आरोपींच्या घरी जाऊन शोध घेण्यात आला.