हरयाणात काँग्रेस नेत्यांची दुसरी पिढी निवडणूक रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:55 AM2019-10-05T04:55:42+5:302019-10-05T04:56:49+5:30
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाने यावेळी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची दुसरी पिढी उतरवली आहे.
- बलवंत तक्षक
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाने यावेळी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची दुसरी पिढी उतरवली आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष हरमहेंद्र सिंह चढ्ढा यांचे चिरंजीव मनदीप सिंह चढ्ढा यांना कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पेहोवा मतदारसंघातून तिकीट दिले गेले आहे. प्रदेश काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले माजी मंत्री फुलचंद मुलाना यांच्या मतदारसंघात त्यांचे चिरंजीव वरुण चौधरी यांना संधी मिळाली आहे. रेवाडी मतदारसंघातून माजी मंत्री कॅप्टन अजय सिंह यादव यांचे चिरंजीव राव यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. माजी मंत्री महेंद्र प्रताप सिंह यांचे चिरंजीव विजय प्रताप सिंह यांना फरिदाबाद जिल्ह्यातील बडखल मतदारसंघातून उतरवले गेले आहे. अनेक निवडणुका पराभूत झालेले डॉ. के. व्ही. सिंह यांच्या जागी यावेळी डबवाली मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव अमित सिहाग यांना तिकीट दिले गेले आहे. माजी मंत्री दिवंगत शिवचरणलाल शर्मा यांचे चिरंजीव नीरज शर्मा यांना फरिदाबाद एनआयटी, माजी मंत्री ब्रजमोहन सिंगला यांचे चिरंजीव अंशुल सिंगला यांना जिंद आणि माजी आमदार मनीराम केहरवाला यांचे नातू शीशपाल केहरवाला यांना कालांवाली मतदारसंघातून संधी मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांची कन्या आरती राव यांना भाजपने रेवाडी मतदारसंघातून तिकीट दिले नाही; परंतु काँग्रेसने त्यांचा धाकटा भाऊ राव यदुवेंद्र सिंह यांना कोसली आणि दुसरा भाऊ अजित सिंह यांचे चिरंजीव राव अर्जुन सिंह यांना अटेली मतदारसंघातून तिकीट दिले आहे. यदुवेंद्र सिंह काँग्रेसच्या तिकिटावर पूर्वी आमदार होतेच, तर अर्जुन सिंह प्रथमच निवडणूक लढवत आहेत.
भाजपकडून ‘टिक-टॉक’ स्टार मैदानात
हरयाणातील आदमपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने ‘टिक-टॉक’ स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाली फोगाट यांना उमेदवारी दिली आहे. टिक-टॉकवर रोजच्या रोज स्वत:चे व्हिडिओ टाकणाºया सोनाली फोगाट यांचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या जोरावर आपण निवडून येऊ, असा दावा त्यांनी केला आहे.
आदमपूरमधून कुलदीप बिष्णोई हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते तिथून तीन वेळा विजयी झाले आहेत. त्यांचे वडील भजनलाल हे हरयाणाचे तीनदा मुख्यमंत्री होते आणि ते तिथूनच निवडून येत. टिक-टॉक स्टारला उभे करून भाजपने तरुणांची मते खेचून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.