नांदेड : जिल्ह्यात दुसर्या टप्प्यात झालेल्या ५७ वाळू घाटाच्या लिलावात केवळ चार घाट लिलावात गेले असून उर्वरित घाटांना बोली मिळाली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले़
वाळूघाट लिलावाच्या पहिल्या टप्प्यात २७ वाळू घाटांतून १७ कोटींचे महसुली उत्पन्न प्रशासनास मिळाले होते. त्यानंतर दुसर्या टप्प्यास सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यात पर्यावरणविषयक बाबींची पूर्तता केल्याचा अहवाल सादर केल्यानंतर वाळूघाटाच्या लिलावास परवानगी मिळाली होती. ५७ वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत केवळ ४ वाळू घाट लिलावात गेले आहेत. त्यामध्ये मुदखेड तालुक्यातील चिलपिंपरी, हदगाव तालुक्यातील धोतरा आणि बिलोली तालुक्यातील चिरली तसेच बोळेगाव-२ या घाटांचा समावेश आहे. मुदखेड तालुक्यातील चिलपिंपरी घाटास ९ लाख ५२ हजार ४९२ रुपये बोलीतून मिळाले आहेत. या घाटाची प्रशासनाने निश्चित केलेली हातची किंमत ९ लाख १२ हजार ४९२ इतकी होती. हदगाव तालुक्यातील धोतरा घाटास १९ लाख २१ हजार ५९२ रुपये प्राप्त झाले आहे तर बिलोली तालुक्यातील चिरली घाटास ४८ लाख ९० हजार ३७० रुपयांचा महसूल मिळाला आहे. या घाटाची शासकीय हातची किंमत ४७ लाख ७० हजार ३७० इतकी होती. दरम्यान, या प्रक्रियेत माहूर तालुक्यातील सायफळ आणि पडसा या दोन वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने फेटाळून लावली आहे. या दोन्ही घाटाला वनविभागाने ना-हरकत प्रमाणपत्र दिले नव्हते. परिणामी इको झोनमध्ये असलेल्या या घाटांची लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली.
अबब...! बोळेगाव -२ घाटास मिळाले ९ कोटी ६५ लाखबिलोली तालुक्यातील बोळेगाव-२ या मांजरा नदीवरील वाळू घाटास यशवंत इंटरप्राईजेसने तब्बल ९ कोटी ६५ लाख ५५ हजारांची बोली लावली आहे. ५ हजार ८८ ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी असलेल्या या घाटाची हातची रक्कम ९५ लाख ५५ हजार २६४ रुपये इतकी ठेवली होती. या वाळूघाटास हातच्या रक्कमेपेक्षा तब्बल दहापट अधिक बोली लागली आहे. त्यामुळे एकूण सीमावर्ती भागातील वाळूचे महत्त्व स्पष्ट होत आहे.