नांदेड : गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांकडून कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येते. गर्दी होऊ नये म्हणून कलम १८८ नुसार गुन्हे नोंदविण्यात येतात. नांदेड जिल्ह्यात या कलमाखाली जवळपास दोन हजारांहून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत; परंतु या कारवाईकडे नागरिक दुर्लक्ष करतात.
कोरोनाचा प्रसार गर्दीमुळे होत असल्याने कलम १८८ नुसार कारवाया करण्यात येत आहेत. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार शासनाने कलम १८८ लागू केल्यानंतर नागरिकांनी गर्दी करू नये, दिलेल्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून सोळाही पोलीस ठाण्यांत जवळपास दोन हजार जणांवर साथरोग नियंत्रण कायद्याखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी शासकीय अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग घडले आहेत. अशा वेळी शासकीय कामात अडथळा केल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
......................
पोलीस अधिकाऱ्याचा कोट
कोरोनाच्या महामारीत पहिल्या टप्यात कठोर लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करून रस्ते अडविण्यात आले होते. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्याला नांदेडकरांनी चांगला प्रतिसाद दिला; परंतु काही ठिकाणी नियमांची पायमल्ली करण्यात आली. अशा वेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
- प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस अधीक्षक
काय आहे कलम १८८
n साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येते. या आदेशाचे पालन न केल्यास शिक्षाही होऊ शकते. एखादी व्यक्ती नियमांचे उल्लंघन करून इतरांना धोका पोहोचवीत असेल तर अशा व्यक्तीला एक महिन्याची शिक्षा आणि दोनशे रुपये दंडाची तरतूद आहे. शिक्षेत सहा महिन्यांपर्यंत वाढ होऊ शकते.