जलदिनानिमित्त जनजागृती
नांदेड, मुक्ताई सेवाभावी संस्थेच्यावतीने जलदिन साजरा करण्यात आला. जल दिनाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने ग्रामीण भागात विविध शेतबांधावर जाऊन शेतक-यांना जलसंवर्धनाविषयी माहिती दिली. तसेच गावात प्रत्येकाने शोषखड्डा तयार करून सांडपाणी गावात मुरेल याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले.
रक्तदान शिबिर
नांदेड, शहीद भगतसिंघजी, शहीद राजगुरू आणि शहीद सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त वजिराबाद येथे रक्तदान शिबिर घेऊन अभिवादन करण्यात आले. कोरोना काळात गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने शहीद भगतसिंघ ग्रुपच्या पुढाकारातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गृहमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी
नांदेड, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्यावतीने अर्धापूर तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे. देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे, विराज देशमुख, भाजपायुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे, सखाराम क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
कोल्हे यांची निवड
नांदेड, मालेगाव येथील संगीता कोल्हे यांची रयत क्रांती संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सीमा पवार यांनी कोल्हे यांना नियुक्तीपत्र दिले. निवडीचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, सीमा पवार, दीपक भोसले, भानुदास शिंदे, सुहास पाटील आदींनी स्वागत केले.
खेळांडूचे स्वागत
नांदेड, कश्मीर येथे होणा-या राष्ट्रीय पिच्यांक सिलॅट स्पर्धेसाठी नांदेडच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या खेळाडूंचे पिच्यांक सिलॅट असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोज जोशी, सचिव संगीता जोशी, स्वारातीम विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार आदींची उपस्थिती होती.
साहित्य वाटप
नांदेड, सेवा ही संघटन या उपक्रमाच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी पुढाकारातून कोविड लस घेणा-या ज्येष्ठांना बिस्कीट, शुद्ध पाणी बॉटल, मास्क आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी ॲड. दिलीप ठाकूर, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, राजेशसिंह ठाकूर आदींची उपस्थिती होती.