धर्माबाद (नांदेड ) : येथील बाजार समितीचे बीट (लिलाव) एक महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. शेतकऱ्यांचा माल, व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नये, कमी भावाने खरेदी केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व दंडात्मक कारवाई केली जाईल, असे जिल्हा उपनिबंधक विभागाकडून पत्र येताच धर्माबाद येथील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. या भीतीने २२ आॅगस्टपासून लिलाव (बीट) करणे बंद केले.
परिणामी, शेतकऱ्यांचा माल घरातच पडून असून व्यवहारासाठी पैसे नसल्याने अडचणीत सापडला. एकीकडे शासन व्यापाऱ्यांवर योग्य जरब बसवला असला तरीही दुसरीकडे शासनाने तरी खरेदीचा प्रारंभ करायला पाहिजे, असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. शासनाच्या हमीभावापेक्षा कमी भावात खाजगी व्यापारी खरेदी करू नये, असा कायदा १९६०-६३ पासून लागू आहे. कायद्यानुसार दुकानदारांचे परवाने रद्द केले जात, आता व्यापाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे, दंडात्मक कारवाई होत असल्याने व्यापाऱ्यांनी माल खरेदी करणे बंद केले. यासंदर्भात मुंबई येथे १० सप्टेंबर रोजी बैठक झाली़ त्या बैठकीत एसएमपी कायदा लागू असून एमएसपीला लागू नसल्याचे म्हटले आहे, अशी माहिती सहाय्यक सचिव वैभव देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. तरीही धर्माबाद मार्केटमध्ये बीट चालू होत नसल्याने शंका निर्माण होत आहे. सध्या बाजार समितीवर प्रशासकाचा कारभार असून जिल्हा उपनिबंधक हे नांदेडवरून कारभार पाहतात.
बाजारात नवीन मूग, उडीद आला असून जुनाही हरभरा, तूर बाजारात येत आहे.२२ आॅगस्ट महिन्यापासून बीट बंद असल्याने शेतकरी हतबल झाला. व्याजाने घेतलेले पैसे कसे फेडावे ? अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. नाफेड खरेदी केंद्र सुरू नाही, व्यापाऱ्यांनी खरेदीचा लिलाव बंद केला़ माल विकावा कुठे ? असा सवाल बंडी पाटील नरवाडे यांनी केला.