भारत दाढेल, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड: पोटाची खळगी भरण्यासाठी अन् आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या उपेक्षित माणसांना अजूनही भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी जिंदगी बरबाद करावी लागते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली; परंतु हे चित्र अद्याप बदलले नाही. एकीकडे देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष, तर दुसरीकडे पोटापाण्यासाठी रस्त्यावर झेंडे विकणारे स्थलांतरित लोक... याचे प्रातिनिधिक चित्र नांदेड शहरातील आयटीआय कॉर्नर या मोक्याच्या ठिकाणी सध्या पाहण्यास मिळत आहे.
राजस्थान येथील बुंदी जिल्ह्यातील देही गावातील बुंदेलवाला हे कुटुंब गेल्या दहा-बारा वर्षांपासून नांदेडला १५ ऑगस्ट, २६ जानेवारीनिमित्त येतात आणि तिरंगा ध्वज, छोटे झेंडे, भिंगरी घेऊन रस्त्यावर बसून विक्री करतात. यातून मिळालेल्या पैशावर त्यांचे जगणे अवलंबून असते. रस्त्याच्या कडेला पाल टाकून ही मंडळी ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत गाव सोडून शेकडो मैल दूर येऊन जीवन जगतात.
मुलाबाळांनी शिकायचे कधी?
आमचे संपूर्ण आयुष्य फिरण्यातच जाते. आमच्या लहान मुलांनाही आमच्यासारखेच गावोगाव फिरून पोट भरावे लागणार आहे. आमच्या लेकराबाळांनी शिकायचे तरी कधी, असा सवाल पारो बुंदेलवाला यांनी उपस्थित केला.
दिल्लीला बनते साहित्य
नागरिकांसाठी छोटे ध्वज, मोठे ध्वज, भिंगरी, तिरंगा बँड, बिल्ला, तिरंगा मफलर, आदी साहित्य दिल्लीला तयार केले जाते. तेथून होलसेल व्यापारी हे साहित्य मागवतात, त्यानंतर लघुविक्रेते हे साहित्य विकत घेऊन रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. त्यातून मिळालेल्या पैशावर त्यांचे पोट असते.
आजोबा, पणजोबांपासून हाच धंदा
रामलखन बुंदेलवाला हा २३ वर्षाचा विवाहित तरुण सांगतो, आमच्या आजोबा, पणजोबांपासून आम्ही हाच धंदा करतो. आमची ही चौथी पिढी... दरवर्षी आम्ही स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाला नांदेडला येऊन झेंडा विक्री करतो. माझे वडील रामकरण बुंदेलवाला हे आम्हाला झेंडा विक्रीसाठी हैदराबाद, नांदेड, जळगाव, भुसावळ अशा अनेक ठिकाणी घेऊन जातात. त्यामुळे माझे शिक्षण झाले नाही. १५ ऑगस्ट झाला की मग सणांच्या निमित्ताने विविध वस्तू विक्री करण्यासाठी आम्ही गावोगाव फिरतो.