हदगाव (नांदेड) : अपघात झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या एका तरुणाला यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समयसूचकता दाखवत स्वतः च्या गाडीतून थेट हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्या तरुणाचे प्राण वाचले आहेत. अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी ( दि. २४ ) मानवावाडी फाटा येथे घडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या समयसूचक अशा या छोट्याशा कृतीतून सर्वांना माणुसकीचे दर्शन घडले आहे.
रविवारी सायंकाळी करमोडी येथिल विठ्ठल मुनेश्वर हा ट्रँक्टर घेऊन हदगाववरुन गावाकडे येत होता. मानवाडीफाट्याजवळ अपघात झाल्याने विठ्ठल गंभीर जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. दरम्यान, यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे हे नांदेडवरुन याचमार्गे यवतमाळकडे जात होते. अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी गाडी थांबवली. क्षणाचाही विचार न करता जखमीला स्वतःच्या चारचाकी गाडीत टाकून थेट हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध झालेल्या या तरुणाला योग्यवेळी उपचार मिळाल्याने प्राण वाचले.
हदगाव येथे अत्यावश्यक उपचार केल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जखमीला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती डॉ. पी. पी. स्वामी यांनी दिली. सध्या अपघात झाला की लोक अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. पण जखमींना तात्काळ मदत मिळाली तर अनेकांचे प्राण वाचू शकतात. हेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.