नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर वाढलेला आहे. शासनाच्या नवीन गाइडलाइननुसार डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा क्वारंटाइन कालावधी बंद करण्यात आला आहे. परिणामी कोविड ड्यूटी करून त्यांना कुटुंबियांच्या संपर्कात यावेच लागते. त्यातून कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात आली असून, अनेकांना काेरोनाची बाधाही झाली आहे. नांदेड जिल्ह्यात मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत म्हणून जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी स्वतच्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावीत आहेत. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करणाऱ्या हजारो जणांचा समावेश आहे; परंतु प्रत्यक्षात रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, टेक्निशियन, ब्रदर्स आदी आपल्यासह आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून कोविड योद्धा म्हणून कोरोनाशी चार हात करीत आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना सात दिवस अलगीकरण करण्यात येणे गरजेचे आहे; परंतु आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना चार दिवस कोविड केअर सेंटरमध्ये ड्यूटी देण्यात येते. त्यानंतर त्यास क्वारंटाइनसाठी पूर्वी दिला जाणारा सात दिवसांचा वेळ बंद करण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात क्वारंटाइन करण्यात येत होते. त्यात सात दिवस ड्यूटीनंतर सात दिवस क्वारंटाइन, पुढे त्यात बदल करून सात दिवस ड्यूटीनंतर तीन दिवस ड्यूटी आणि सध्या चार दिवसांची ड्यूटी; परंतु क्वारंटाइन करण्यात येत नाही. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबियांशी थेट संपर्क येऊन कुटुंबाचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. यातून अनेक डॉक्टर, कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यही पॉझिटिव्ह आल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत काम करणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचा सन्मान व्हायलाच हवा.
कोविड केअर सेंटरमध्ये सलग सात दिवस ड्यूटी केल्यानंतर किमान तीन दिवसांचा तरी आराम हवा. ड्यूटीने थकवा येऊन पुन्हा ड्यूटी करण्याची मानसिकता राहत नाही, तसेच कुटुंबातील सदस्यांच्या काळजीच्या अनुषंगाने परिपूर्ण काळजी घेतली जाते. - डाॅ. लीना कलाने, आरोग्य कर्मचारी.
आजच्या परिस्थितीत कर्तव्याला प्राधान्य देत आहोत. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांना शक्यतो दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो; परंतु काळजी घेऊनही घरातील दोन सदस्यांना कोरोना झालाच. प्रत्येकाने काळजी घेणे हाच संसर्ग रोखण्याचा उपाय आहे. - डॉ. प्रशांत गजभारे, आरोग्य कर्मचारी
ड्यूटीवरून घरी गेल्यानंतर आंघोळ, सॅनिटायजिंग ही प्राथमिक काळजी प्रत्येक जण घेतो; परंतु लहान मुले आणि वयस्कांना अधिक धोका होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो त्यांच्या संपर्कात येतच नाही. क्वारंटाइन कालावधी कमी केल्याने कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. - डॉ.संज्योत गिरी, आरोग्य कर्मचारी.
डॉक्टर म्हणून सेवा देणे डॉक्टरांचे कर्तव्यच आहे. अशा परिस्थितीत आपल्या घरात डॉक्टर असल्याचा अभिमानच वाटतो. ड्यूटी करून आल्यानंतर त्यांच्याकडून, तसेच आमच्याकडूनही आम्ही स्वच्छतेसह सॅनिटायजिंगला प्राधान्य देतो, तसेच आवश्यक ती खबरदारीही घेतो. - प्रदीप गजभारे
कोविड केअर सेंटरमध्ये ड्यूटी करून आल्यानंतर लेकरांना जवळ घेता येत नाही, तसेच वयस्क आई-वडिलांनादेखील जवळ बसून विचारपूस करण्याची भीती वाटते. त्यामुळे सध्याच्या कालावधीत कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे पालन करून घरातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवतो.- विनय भोसले.