अशोक चव्हाणांकडून काँग्रेसला पहिला मोठा हादरा; ५५ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 03:36 PM2024-02-24T15:36:56+5:302024-02-24T15:38:39+5:30
अशोक चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
BJP Ashok Chavan ( Marathi News ) :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये जाताच चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि निवडणूक बिनविरोध झाल्याने त्यांची खासदारपदी वर्णीही लागली. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे समर्थक कार्यकर्तेही काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्का दिला असून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील ५५ माजी नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.
"नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो, असंही ते म्हणाले.
दरम्यान, नांदेड हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना नांदेडमधून पराभवाचा सामना करावा लागला असला तरी जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क असून कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनंतर अशोक चव्हाण समर्थक आमदार आणि अन्य काही नेतेही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत येत्या काही दिवसांत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सुमारे ५५ हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी आज विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis… pic.twitter.com/LvkQOQGYGm
— Ashok Chavan (@AshokChavan1958) February 24, 2024
अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास
२९ ऑक्टोबर १९५८ - मुंबई येथे अशोक चव्हाण यांचा जन्म
१४ मे १९८२ : अमिता शर्मा यांच्याशी विवाह. त्यानंतर वडील माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय राजकारणात प्रवेश
१९८४ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस.
मार्च १९८७ - नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा संसदेत
१९८९ : लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या लाटेत डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्याकडून पराभव.
१९९२ : शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचे पालकमंत्री.
फेब्रुवारी १९९३ : विधान परिषदेवर नियुक्ती.
ऑक्टोबर १९९९ : तत्कालीन मुदखेड विधानसभेतून ३५,०००च्या मताधिक्याने विजयी.
२ नोव्हेंबर १९९९ : विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री.
सप्टेंबर २००३ : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात परिवहनमंत्री.
ऑक्टोबर २००४ : मुदखेड मतदारसंघातून ७० हजार मतांनी विजयी. उद्योग खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती.
२००८ : राज्याचे मुख्यमंत्री
ऑक्टोबर २००९ : नव्याने निर्माण झालेल्या भोकर मतदारसंघातून १ लाख मतांनी विजयी.
नोव्हेंबर २००९ : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री.
मे २०१४ : नांदेड लोकसभा मतदारसंघातून ८२ हजारांच्या मताधिक्याने विजयी.
२०१० : आदर्श घोटाळ्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा.
जानेवारी २०१७ : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड.
मे २०१९ : भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून ४२ हजार मतांनी पराभव. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
ऑक्टोबर २०१९ - भोकरमधून ५२,००० मतांनी विजय.
५ डिसेंबर २०१९ : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री
२०२२ - शिंदे गटाची बंडखोरी आणि ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिपद गेले.
१२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा.