विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित ही परीक्षा नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेतली जाते. महाराष्ट्र व गोवा या राज्यांत होणारी ही ३६ वी सेट परीक्षा असून, विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या सूचनांचे पालन करत ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षा सुरळीत पार पाडावी याकरिता २१ परीक्षा केंद्रांच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ. बिपिन यांनी कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र परिसराच्या १०० मीटर परिसरात परीक्षार्थींव्यतिरिक्त इतरांना प्रवेश मिळणार नाही. तसेच परीक्षा केंद्र परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, झेरॉक्स, भ्रमणध्वनी, फॅक्स, ध्वनिक्षेपक सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद असतील, असा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. या कलावधीत परीक्षा केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त असेल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील यशवंत, एमजीएम, एनसी लॉ कॉलेज, शासकीय तंत्र निकेतन, ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ग्रामीण कॉलेज ऑफ सायन्स, ग्रामीण तंत्रनिकेतन, सायन्स कॉलेज, नागार्जुना पब्लिक स्कूल, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी, मातोश्री प्रतिष्ठाण अभियांत्रिकी व तंत्र निकेतन, एनएसबी कॉलेज, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी व बीएड कॉलेज, प्रतिभा निकेतन महाविद्यालय, वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको, वसंतराव नाईक महाविद्यालय सिडको या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेकरिता नांदेड शहरातील परीक्षा केंद्रांवर ८५०० विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत. परीक्षार्थींना कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.