नांदेड: जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सी-व्हिजील अॅपद्वारे दोन गुन्हे दाखल झाले असून या अॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन राज्यात पहिल्यांदाच नांदेड जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झाली आहे. ४८ तासांत शासकीय कार्यालय, निमशासकीय, राजकीय पक्षांना प्रचाराशी संबंधित छायाचित्र हटविण्याची मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही राजकीय पक्षाशी संबंधित छायाचित्र, मजकूर असल्याने निवडणूक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. पहिला गुन्हा नायगाव तालुक्यात रामतीर्थ पोलीस ठाण्यात दाखल झाला. नायगाव, नरसी रस्त्यावर एनआरगुडगिला इंडियन आॅईल पेट्रोलपंपावर राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीची जाहिरात लावण्यात आली होती. या प्रकरणी आचारसंहिता प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला. दुसरा गुन्हा नांदेडमधील वजिराबाद ठाण्यात दाखल झाला. नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात राजकीय पक्षाशी संबंधित बॅनर आढळल्याने आगार व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. महापालिका इमारतीत राजकीय पक्षाचा प्रचार केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बॅनर लावल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला तर शहरातीलच इतवारा ठाण्यात बाबा भारत गॅस एजन्सी येथे उद्घाटनाच्या बॅनरवर राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोटो असल्याने आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ मार्चपर्यंत एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सी-व्हिजील अॅपच्या तक्रारीचा राज्यात पहिला गुन्हासी-व्हीजील या अॅपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन राज्यातील पहिला गुन्हा हदगाव ठाण्यात दाखल झाला. हदगावच्या माजी नगराध्यक्षांच्या मोटारसायकलवर राजकीय पक्षाच्या ध्वजाचे स्टिकर असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी तक्रार एसबीआय बँकेच्या धनेगाव शाखेच्या व्यवस्थापकाविरुद्ध दाखल करण्यात आला. नवीन नांदेडातील यशोधरानगरमध्ये असलेल्या एटीएमवर प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जाहिरात सुरु असल्याची तक्रार सी-व्हीजीलच्या माध्यमातून केली होती. या तक्रारीची शहानिशा केली असता ती खरी आढळली. त्यामुळे नांदेड ग्रामीण पोलिसांनी आचारसंहितेचा गुन्हा दाखल केला. सी-व्हिजीलच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पाच तक्रारीपैकी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यात तीन तक्रारी हदगाव विधानसभा मतदारसंघात आणि नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदारसंघात प्रत्येकी एक तक्रार प्राप्त झाली आहे.
आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:19 AM
जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सी-व्हिजील अॅपद्वारे दोन गुन्हे दाखल झाले
ठळक मुद्देराजकीय छायाचित्र, मजकूर न हटविल्याने झाली कारवाई