- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) : तालुक्यातील पिंपळगाव म.परिसरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. असना नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना महसूल व पोलीस प्रशासनाने दिलासा दिला आहे. स्थानिकांच्या सहकार्याने प्रशासनाने अथक परिश्रम करून पुरात अडकेल्या सात जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.
असना नदीला आलेल्या पुरामुळे पिंपळगाव महादेव येथे शेतात कामानिमित्त गेलेले सात शेतमजुर अडकले. मुसळधार पावसामुळे असना नदी दुथडी भरून वाहत होती. जीव वाचविण्यासाठी मजूरांनी उंच भागाचा आसरा घेतला. यावेळी मोबाईल बंद असल्याने कोणताही संपर्क होत नव्हता. दरम्यान, याची माहिती प्रशासनाला मिळाली. तहसीलदार सुजित नरहरे, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, पोलीस निरीक्षक अशोक जाधव,गट विकास अधिकारी मिना रावताळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बालाजी तोरणे,वि.अ.एस.पि.गोखले, तलाठी बि.ए.मोरे यांनी स्थानिकांसह घटनास्थळ गाठले. प्रशासनाचे पथक पाण्यातून जात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले.
सात जणांमध्ये सहा महिन्यांची गर्भवती महिला पुजा दादाराव राठोड ( २२ ) यांच्यासह दादाराव मधुकर राठोड ( २५) , आराध्या दादाराव राठोड ( ४, सर्व राहणार उनकेश्वर ता.माहुर जि.नांदेड ) , गणेश हरी सोळंके ( २५, मूकबधिर), संगिता गणेश सोळंके ( २२), पायल गणेश सोळंके ( १२ ), अजय गणेश सोळंके ( ९ , सर्व राहणार हादगाव जि. नांदेड ) अशा सात जणांना शेलगावमार्गे पथकाने सुरक्षित बाहेर काढले. या मोहोमेत गोविंद कल्याणकर, अनिल कल्याणकर, रावसाहेब राजेगोरे, किशन कल्याणकर, पोलिस पाटील उल्हासराव कल्याणकर, बाबुराव राजेगोरे, प्रदिप कल्याणकर, नारायण राजेगोरे, सरपंच कपिल दुधमल आदींनी सहभाग घेतला.