नांदेड- अट्टल गुन्हेगारांना विक्री करण्यासाठी आणलेले ७ गावठी पिस्टल आणि ११६ जीवंत काडतूसे घेवून आलेल्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. ही कारवाई गांधी जयंतीदिनी वाघी ते नाळेश्वर रस्त्यावर करण्यात आली. यावेळी आरोपींनी पोलिस पथकावर हल्लाही केला. परंतु बळाचा वापर करुन पोलिसांनी चारही जणांच्या मुसक्या आवळल्या.
२०२० पासून हे चारही आरोपी पिस्टल खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सक्रिय हाेते. या कारवाईमुळे अवैध पिस्टल विक्रीचे मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षात मिसरुड न फुटलेल्या आरोपींकडूनही गावठी कट्ट्याचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेकांकडून पिस्टल अन् काडतूसे जप्त केली आहे. परंतु पिस्टल नांदेडात पुरवठा करणारे मात्र पोलिसांच्या हाती लागले नव्हते. २ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.द्वारकादास चिखलीकर यांना खबर्याकडून पिस्टल विक्री करणार्यांची माहिती मिळाली. त्यानंतर सपोनि रवि वाहूळे, सपोनि पांडूरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे यांचे पथक वाघी ते नाळेश्वर रस्त्यावरील आरटीओ कार्यालयाजवळ गेले.
या ठिकाणी आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करुन कमलेश उर्फ आशू पाटील बालाजी लिंबापूरे रा.वसरणी, बलबिरसिंघ उर्फ शेरा प्रतापसिंग जाधव रा.यात्री निवास, हिंगोली गेट, शेख शाहबाज शेख शकील रा.दुध डेअरी, रहिमपूर आणि शामसिंग उर्फ शाम्या गेंदासिंघ मठवाले रा.गुरुद्वारा गेट क्रमांक २ या चार जणांना पकडले. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या पथकावर हल्ल्याचाही प्रयत्न केला. चारही आरोपींकडून विक्रीसाठी आणलेले ७ गावठी पिस्टल आणि ११६ जीवंत काडतूसे जप्त केली.
पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकात गोविंद मुंडे, सपोउपनि माधव केंद्रे, गुंडेराव करले, बालाजी तेलंग, दीपक पवार, संजीव जिंकलवाड, बालाजी यादगीरवाड, विकास कदम, तानाजी येळगे, गजानन बयनवाड, देवा चव्हाण, रणधीरसिंग राजबन्सी, ज्वालासिंघ बावरी, हनुमान ठाकूर, शेख कलीम, बालाजी मुंडे, सायबरचे दीपक ओढणे, राजू सिटीकर यांचा समावेश होता.
पिस्टल पुरविण्याचे कारस्थानअटकेत असलेल्या चारही आरोपींनी हैद्राबाद येथे आशिष सपूरे आणि रबज्योतसिंघ उर्फ गब्या तिवाना यांच्यासह नांदेड येथे मोठ्या प्रमाणात गावठी पिस्टल पुरविण्याचे कारस्थान रचले होते. त्यासाठी आशिष सपूरे आणि रबज्योतिसंघ हे दोघे जण त्यांना पैसे पुरवित हाेते. नांदेडात आणल्यानंतर हे पिस्टल विक्री करण्यात येत हाेते.
हॅन्डग्रेनेडही होते पुरविणारपकडलेले चारही आरोपी अट्टल गुन्हेगार असून गेल्या तीन वर्षात त्यांनी नांदेडात अनेकांना गावठी पिस्टल पुरविल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ते हॅन्डग्रेनेडही उपलब्ध करुन देणार होते अशी माहिती पोलिसांकडे आहे.