कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खासगी व्यापाऱ्यांनी यापूर्वीच खरेदी करून साठवून ठेवला आहे. सीसीआयचा भाव चांगला असल्याने खरेदी केलेला कापूस आता सीसीआयच्या खरेदी केंद्रावर जाणार आहे. त्यासाठी खासगी व्यापारी शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा घेऊ शकतात तसे झाले तर गरजू व गरीब शेतकऱ्यांचा नंबर लागणार नाही त्याचे वाईट परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतील जर शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना आधार कार्ड व इतर कागदपत्रे दिल्यास शेतकऱ्यांना प्रमाणापेक्षा जास्त रक्कम माल विकल्याने आल्यास आपल्याला कर्जमाफीच्या यादीतून वगळण्यात येईल, कारण उत्पन्न अधिक असेल. याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान दोन दोन हजारांचा निधी बंद होईल. याशिवाय मिळणाऱ्या विविध सबसिडी बंद होतील. अनेक सवलतींपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागेल, असे अनेक जाणकार शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कापूस हंगामात सीसीआयची खरेदी सुरू होऊनही ४ डिसेंबरपर्यंत ३२९ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ९ हजार १८ क्विंटल १० किलो कापूस विक्रीस आला आहे. त्यामानाने खूप कमी कापूस आला आहे; पण येत्या काळात आवक वाढण्याची शक्यता असून खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या माथी हा कापूस मरतील आणि आधार लिंकमुळे हा सर्व प्रकार उघड होऊ शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले कोणतेही कागदपत्रे आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा खासगी व्यापाऱ्यांना देऊ नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवी तिरमनवार यांनी केले आहे.