नांदेड : महाविकास आघाडीचा नेता निवडीत पवार चुकले आहेत. त्याची आता त्यांना जाणीव झाली. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली होती; परंतु ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही. ते आघाडीतील तीन पक्षांचे नेतृत्व कसे करतील? हे शरद पवारांना आता कळले आहे. त्यामुळेच आपल्या आत्मचरित्रात त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नाही, अशी खंत व्यक्त केली होती, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
भाजपच्या बुथ कमिटी सदस्यांच्या बैठका आणि संघटन वाढीसाठी बावनकुळे हे मंगळवारी नांदेडात आले होते. सध्या राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात दररोज एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री असताना ठाकरे हे अडीच वर्षे मंत्रालयात गेले नाहीत. या काळात त्यांच्या खिशाला साधा पेनही नव्हता. हे शरद पवारांनीच सांगितले आहे. त्यामुळे तीन पक्षाचे नेतृत्व आपण करू शकत नाही, अशी शंका ठाकरे यांना आली असेल. त्यामुळेच ते राऊत यांच्या मुखातून आपला संताप व्यक्त करीत आहेत. आजही ठाकरे हे शिल्लक आमदारांना भेटत नाहीत. त्यामुळे शिल्लक सेनेतील हिंदुत्ववादी विचारांचे आमदार आमच्याकडे येणार असतील त्यांचे स्वागत आहे, असेही बावनकुळे म्हणाले. यावेळी खासदार प्रतापराव चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, महानगराध्यक्ष प्रवीण साले यांची उपस्थिती होती.
पवारांनी घटनाच बदलली असे मी म्हणालो...रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारली आहे. संस्थेच्या घटनेत राज्याचा मुख्यमंत्री अध्यक्ष असल्याचे नमूद आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना संस्थेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी घटनेत बदल करून स्वत: आजीवन अध्यक्ष राहण्याचे नमूद केले. अशाच प्रकारे पवार यांनी इतर संस्थांच्या घटनेत बदल करून स्वत: त्याचे अध्यक्ष झाले. असे असताना स्वत: काढलेल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ते कसा देतील? असे मी बोललो, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.