नांदेड : सहकार चळवळ उभारण्याच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपआपसात कारखाने वाटून घेतले. त्यात शरद पवारांच्या चेल्याचपाट्यांनी सहकार क्षेत्राचे श्राद्ध घातले असा घणाघाती आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.
शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त बुधवारी ते नांदेडात आले होते. ते म्हणाले, सहकार क्षेत्रातून सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी यांना मालक बनविण्याचा मुख्य उद्देश होता. त्या माध्यमातून राज्यात सहकारी साखर कारखाने उभारण्यात आले. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे कारखाने आपसात वाटून घेतले. राज्यात ५५ साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांचा घोळ २५ हजार कोटींचा आहे. जिल्हा सहकारी बँकाही घोटाळ्यांनी बरबटल्या आहेत. साखर कारखाने लाटण्यासाठी शरद पवारांच्या चेल्यांनी खोट्या खाजगी कंपन्या नोंदणीकृत केल्या. ज्यामध्ये कोणतीही उलाढाल नव्हती. दहा ते बारा कोटी रुपयांमध्ये त्यांनी हे साखर कारखाने खरेदी केले. हे सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे होण्याची गरज आहे. ( Sharad Pawar's activits pay homage to co-operative sector, Sadabhau Khot )
गेल्या हंगामात सोयाबीनच्या बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ५० हजार शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या. परंतु, त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. मागील हंगामात शेतकऱ्यांनी ५ हजार ८०० कोटी रुपयांचा विमा भरला. परंतु नुकसान भरपाई म्हणून फक्त ९०० कोटी रुपये देण्यात आले. पीक विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करणारी शिवसेना आता सत्तेची फळे चाखण्यात मग्न आहे. राज्यात फक्त २० पीक कर्ज देण्यात आले आहे. असेही खोत म्हणाले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पांडव मंगनाळे, डॉ.दत्ता मोरे, जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, सचिन कदम यांची उपस्थिती होती.