नांदेड : महापालिकेत एकतर्फी बहुमत प्राप्त झाल्यानंतर महापौरपदी शीला भवरे आणि उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड निश्चित होती. यानुसार निवड प्रक्रिया पार पडताच महापौर पदासाठी शीलाताई भवरे यांना ७४ तर भाजपाच्या बेबीताई गुपिले यांना ६ मते पडल्याचे स्पष्ट झाले व भवरे विजयी झाल्या. यासोबतच उपमहापौर पदी कॉंग्रेसचे विनय गिरडे सुद्धा ७४ मते घेऊन विजयी झाले. मतदानात शिवसेनेचा एकमेव सदस्य तटस्थ राहिला.
महापालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काम पाहिले. सुरुवातीला पहिल्या १५ मिनिटांत अर्जांची छाननी झाली व उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठीही वेळ देण्यात आला. त्यानंतर महापौर पदासाठी काँग्रेसच्या शीला किशोर भवरे व भाजपाच्या बेबी गुपिले यांच्यात निवडणूक पार पडली. उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून विनय गिरडे तर त्यांच्या विरोधात भाजपाच्या गुरप्रीतकौर सोडी उभा होते. महापालिकेत काँग्रेसचे ८१ पैकी ७३ तर भाजपाचे ६ नगरसेवक आहेत. शिवसेना १ आणि अपक्ष १ असे सदस्यही सभागृहात आहेत.
एकतर्फी झाली लढत
काँग्रेसला महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी बहुमतामुळे शीला भवरे या तब्बल ७४ मते घेऊन विजयी झाल्या. त्या नांदेड शहराच्या अकराव्या महापौर व दलित समाजातील पहिल्या महापौर ठरल्या. तसेच उपमहापौर पदी कॉंग्रेसचे विनय गिरडे सुद्धा ७४ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजपच्या गुरप्रीतकौर सोडी यांचा ७४ विरूद्ध ६ मतानी केला पराभव केला. दोन्ही निवडीत शिवसेनेचा एक सदस्य तटस्थ राहिला व अपक्षाने कॉंग्रेसला साथ दिली.
आतापर्यंतचे महापौरमहापालिकेच्या कार्यकाळात पहिले महापौर सुधाकर पांढरे वगळता इतर दहा महापौर हे काँग्रेसचेच राहिले आहेत. पांढरे यांच्यानंतर पहिल्या महिला महापौर म्हणून काँग्रेसच्या मंगला निमकर यांची निवड झाली. त्यानंतर गंगाधर मोरे, ओमप्रकाश पोकर्णा, अ. शमीम बेगम अ. हफीज, बलवंतसिंघ गाडीवाले, प्रकाशचंद मुथा, अजयसिंह बिसेन, अब्दुल सत्तार आणि शैलजा स्वामी यांनी शहराचे महापौर पद भूषविले. आतापर्यंत झालेल्या १० महापौरांमध्ये तीन महिलांनी महापौर पद भूषविले आहे. आता चौथ्यांदा शीला भवरे यांची महिला महापौर म्हणून निवड झाली.