गुणवंतांचा सत्कार
वाईबाजार - वाईबाजार परिसरातील गुणवंतांचा सत्कार डॉ.निरंजन केशवे यांनी त्यांच्या घरी जाऊन केला. यामध्ये मुस्कान शेख जब्बार, सना शेख मजीद यांचा समावेश आहे. याप्रसंगी शेख जब्बार, अबीद खिच्ची, मिसार कुरेशी, अजीम सय्यद, राजकिरण देशमुख आदी उपस्थित होते.
महिला पदाधिकारी
मुदखेड - मुदखेड तालुका भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच झाली. जिल्हा सरचिटणीस म्हणून केतकी चौधरी, तर लक्ष्मीबाई हटकर यांची एस.सी. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, वर्षा चंद्रे यांची ओबीसी महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस तसेच जया देशमुख, मेघा गोदरे, दीपाली गोडसे, सुनीता मांगूळकर आदींचीही निवड झाली.
अवैध वृक्षतोड वाढली
नरसीफाटा - नायगाव तालुक्यातील नरसीसह परिसरात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नांदेड-हैदराबाद या राज्य मार्गावरून नरसी-नायगाव रोडवर तोडलेल्या वृक्षाची वाहतूक सुरू असते. वृक्षाची तोड करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. कत्तल केलेल्या वृक्षाची ट्रॅक्टरमध्ये भरून त्याची वाहतूक सुरू आहे. वनविभागाने यासंदर्भात काहीही कारवाई केली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
हरनियावर यशस्वी शस्त्रक्रिया
मुदखेड - येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एनक्रिप्टेड हायड्रोसील व हरनियाच्या रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप फुगारे यांनी दिली. शस्त्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.कपिल जाधव, डॉ.संजय कदम, डॉ.गायत्री राठोड, डॉ.अनुरकर, तरोडे मॅडम, पंकज बंधू, प्रकाश, राणी, महंमद अली यांनी मदत केली.
पेन्शनसाठी हेलपाटे
हदगाव - बरडशेवाळा येथील स्वातंत्र्यसैनिक पुंजाराम वडकुते यांच्या पत्नीचे नोव्हेंबर २०१९ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या पत्नीची पेन्शन अद्यापही मंजूर न झाल्याने वडकुते यांची गैरसोय होत आहे. या संदर्भात संबंधितांनी लक्ष घालावे अशी मागणी स्वातंत्र्यसैनिक पुंजाराम वडकुते यांनी केली.
चेनापूर येथे चोरी
अर्धापूर - अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथे ८० हजारांची चोरी झाली. चेनापूर येथील फुलाजी जंगीलवाड यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या खापरावरून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील रोख १० हजार रुपये, सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. अर्धापूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
गहू पेरणीला सुरुवात
देगलूर - तालुक्यात कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचा कल आता गव्हाकडे वळला आहे. मूग, उडीद पिकाचेही नुकसान कपाशीच्या माध्यमातून वसूल होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. मात्र कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकरी गव्हाकडे वळला आहे.
पोलिसांकडून अभिवादन
मुखेड - महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पोलिसांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबळे, जमादार चंदर आबेवार, पोलीस कॉन्स्टेबल बळीराम सूर्यवंशी, चालक रमेश जोगपेठे आदी उपस्थित होते.
कबड्डी स्पर्धा सुरू
हिमायतनगर - तालुक्यातील पिंचोडी येथे बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला सोपान बोंपिलवार, सोनबा सवनेकर, विशाल राठोड, कैलास डुडुळे, पांडुरंग धनवे, मिरासे, पांढरे, देवकत्ते, देशमुखे आदी उपस्थित होते. स्पर्धेत निर्मल जिल्ह्यातील दोडना तांडा येथील संघ प्रथम, तर जय बिरसा संघकुपटी हा द्वितीय आला. जय सेवालालसंघ वडगाव ता. हिमायतनगर आणि चौथे बक्षीस जय बिरसा संघ रिठाने मिळविले.