कुंडलवाडी : कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार काँग्रेसच्या मदतीने नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेहाना शेख यांचा १० विरूद्ध ६ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत भाजपाचे चार सदस्य फुटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला असून या माध्यमातून जिल्ह्यात सत्ता असलेली एकमेव नगरपालिकाही भाजपाच्या हातून निसटली आहे.
कुंडलवाडी नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी निवडणूक पार पडली. १७ सदस्यीय असलेल्या या पालिकेत शिवसेना ३, काँग्रेस ४ व भाजपा १० असे पक्षीय बलाबल होते. मात्र भाजपाचे पाच नगरसेवक महाविकास आघाडीत दाखल झाल्याने या निवडणुकीतील रंगत वाढली होती. सत्ताधारी भाजपाकडून मागील १० दिवसांपासून या नाराज नगरसेवकांचे मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न विविध पातळीवर सुरू होते. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले.
गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. नगरसेवकांनी ऑनलाईन मतदान केले. यात महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार सुरेखा जिठ्ठावार यांना १० तर भाजपा उमेदवार शेख रेहाना यांना ६ मते मिळाली. तर एक नगरसेवक तटस्थ राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी काम पाहिले. कुंडलवाडीत भाजपा उमेदवाराचा पराभव झाल्याने पक्षाच्या ताब्यातील जिल्ह्यातील एकमेव नगरपालिकाही हातातून गेल्याने भाजपाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.