नांदेड : राज्यात भाजपचे १०५ आमदार असूनही शिवसेनेने विरोधी बाकावर बसविले. या अप्रत्यक्ष पराभवाचे शल्य भाजपला नेहमीच बोचत राहिले आहे. त्यातूनच संधी मिळेल तेंव्हा भाजपची मंडळी शिवसेनेला टार्गेट करताना दिसते. भाजप-शिवसेनेतून विस्तवही जात नसताना गुरुवारी नांदेडमध्ये शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत अचानक भाजप महिला नेत्या, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या दारात पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यातच सामंत हे आपला आशीर्वाद घ्यायला आले होते, असे पाटील यांनी सांगितल्याने जिल्हाभर राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत बुधवारी सायंकाळपासून नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी भाजप नेत्या सूर्यकांता पाटील यांच्या घरी अचानक भेट दिल्याने या भेटीची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा होऊ लागली आहे. या भेटीवेळी शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे आमदार बालाजी कल्याणकर हेसुद्धा उपस्थित होते. नांदेड-हिंगोलीच्या राजकारणात महिला नेत्या म्हणून कायम दबदबा राहिलेल्या पाटील आणि सामंत यांच्या भेटीने चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सूर्यकांत पाटील आणि उदय सामंत यांनी सोबत काम केलेले आहे. सूर्यकांता पाटील यांनी तर तब्बल ३६ वर्षे विविध पदावर राहून काम केले असून, मागील ४२ वर्षांपासून त्या राजकारणात आहेत; परंतु २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आल्याने त्या पक्षावर नाराज झाल्या. त्यांनी कालांतराने भाजपमध्ये प्रवेश केला; परंतु २०१९ मध्ये सदर जागा युतीच्या कोट्यातून शिवसेनेकडे गेल्याने त्यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची दुसरी संधीही हुकली. मात्र, युती धर्म पाळत त्यांनी लोकसभेला हेमंत पाटील यांचे काम केले.
चौकट....
ऑक्टोबरमध्ये राजकीय उलथापालथ
या भेटीच्या निमित्ताने सूर्यकांता पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात आणि राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होतील, त्या लोकांना अनपेक्षित असतील. राज्यातील तीनही पक्षांत सुरू असलेली खदखद कोणीही थांबवू शकणार नाही. सध्या राज्यातील सरकार तीन चाकांच्या गाडीवर आहे. त्यापैकी कोणतं चाक कोणाला भारी पडेल, हे दिवाळीपर्यंत कळेलच, असे सांगत पाटील यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा सूचक इशाराही दिला.
चौकट......
एक निवडणूक लढविणारच
सूर्यकांता पाटील म्हणाल्या, जिल्ह्याच्या राजकारणात आपल्याला रस नाही. मात्र, भाजप या शिस्तीच्या पक्षात एक निवडणूक निश्चित लढविणार. शिवसेनेकडून संधी मिळाली तर हदगाव विधानसभा लढविणार काय? या प्रश्नावर त्यांनी ही संधी खूप छोटी असेल, मात्र पक्षाकडून जो आदेश येईल तो पाळला जाईल. येणाऱ्या संधीची वाट पाहतेय; परंतु माझे प्राधान्य लोकसभेला राहील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
कोट....
ही राजकीय भेट नव्हती. उदय सामंत आपले आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यात गैर काहीही नाही..
- सूर्यकांता पाटील (भाजपा)
माजी राज्यमंत्री
कोट....
शिवसेना नेते उदय सामंत यांची चंद्रकांता पाटील यांच्याकडील भेट खासगी स्वरूपाची होती. त्यात राजकीय काहीही चर्चा झाली नाही.
-बालाजी कल्याणकर
आमदार शिवसेना