शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 07:03 PM2021-03-02T19:03:58+5:302021-03-02T19:04:49+5:30
धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे.
नांदेड : शिवसेनेचा वाघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सध्या मवाळ झाले आहेत. अनेक निर्णयांत त्यांना तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे खूप दूर निघून गेले आहेत; परंतु अजूनही वेळ गेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर शिवशक्ती-भीमशक्तीचे त्यांचे स्वप्न पूर्ण करा आणि बॅक टू पॅव्हेलियन या, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
केंद्रीय मंत्री आठवले हे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी आठवले म्हणाले, ‘‘धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल; परंतु अशा प्रकरणामुळे तीन पायांचे हे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही. काँग्रेसनेही आता नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले आहे. ते कुणालाही भीक घालणार नाहीत. सत्तेत जर काँग्रेसला न्याय मिळत नसेल तर त्यांनी लगेच बाहेर पडावे. या सरकारमधून सर्वप्रथम काँग्रेसच बाहेर पडेल अशी भविष्यवाणीही आठवले यांनी केली.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले पाहिजे. एवढे दिवस अशाप्रकारे आंदोलन करणे योग्य नाही. नामांतराच्या वेळी आम्हीही आंदोलन केले होते; परंतु काही वेळेला दोन पावले मागे आलो होतो. सरकार चर्चेसाठी तयार आहे; परंतु आंदोलकांचे नेते कायदाच मागे घेण्याच्या अटीवर ठाम आहेत. त्यामुळे हा कायदा मागे घेतल्यास अशाचप्रकारे इतर कायदे मागे घेण्याची मागणी जोर धरू शकते आणि लोकशाहीसाठी हे घातक असल्याचे ते म्हणाले.
आंबेडकरी राजकारणासाठी युती आवश्यकच
रिपब्लिकन ऐक्यासाठी सर्व नेते तयार होत नाहीत. मी बाळासाहेब आंबेडकरांना अनेक वेळा त्यासाठी साद घातली; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बाळासाहेबांचा वंचितचा प्रयोग चांगला होता. लोकसभेत त्यांना भरभरून मतेही मिळाली; परंतु लोकसभेत आणि विधानसभेत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. एकूण राजकीय परिस्थिती पाहता स्वत:च्या ताकदीवर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला युती करूनच निवडणुका लढवाव्या लागतील. त्यासाठी नव्या पिढीने सकारात्मक राजकारण करण्याची गरज असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.