नांदेड : नागपूर येथून नांदेडला येणाऱ्या शिवशाही बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याखाली उतरली. या घटनेत वाहकासह चार प्रवासी जखमी झाले असून ही घटना बुधवारी पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास नांदेड नजीक असलेल्या महादेव पिंपळगाव जवळ घडली.
बुधवारी पहाटे नागपूर ते तुळजापूर हायवे वर मौजे पिंपळगाव येथे दशमेश ढाब्याजवळ शिवशाही बस (क्र. MH 06 BW 0813 ) नागपूरकडून नांदेड येथे जात असताना चालकास डुलकी लागल्याने बसवरील नियंत्रण जाऊन रोडचे बाजूला असलेले साइन बोर्डचे खांबाला धडकून अपघात झाला. यामध्ये श्याम कृष्णराव डोरे, वय 49 रा. बांगर नगर यवतमाळ , नामदेव यशवंतराव कावळे (वाहक) वय 29 रा. नागपूर हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच कैलास शेळके (चालक शिवशाही बस) वय 41 रा.चिंचोली, दिग्रस जि यवतमाळ, राम कृष्णराव डोरे वय 53 रा. बंगरनगर यवतमाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जखमींना शासकीय जिल्हा रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केले. त्यानंतर वाहतुक सुरळीत केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विभाग नियंत्रक अविनाश कचरे आणि नांदेडचे आगार व्यवस्थापक व्यवहारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शासकीय रुग्णालय गाठून जखमींना मदत केली. या अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.