नांदेड : येथील जिल्हा न्यायालयात न्या. एस. ई. बांगर यांच्यासमोर दरोड्याच्या गुन्ह्यात सुनावणी सुरू असताना वकील सोबत नसल्याने आराेपीने न्यायाधीशांसोबत वाद घालत त्यांच्या दिशेने चप्पल भिरकाविली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतले असून, न्यायालयाने तत्काळ सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बुधवारी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी दत्ता हंबर्डे याला न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. त्यानंतर न्या. एस. ई. बांगर यांच्यासमोर सुनावणी सुरू होण्यापूर्वी त्यांनी आरोपीला तुमचे वकील सोबत नाहीत का, असा प्रश्न विचारला. त्यावरून आरोपी दत्ता हंबर्डे याने न्या. बांगर यांच्याशीच वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोर्ट रूममध्ये असलेले इतर वकील आणि कर्मचारीही हैराण झाले होते.
काही कळायच्या आत हंबर्डेने पायातील चप्पल काढून बांगर यांच्या दिशेने फेकली. परंतु, कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीशांच्या समोर काचा लावण्यात आल्या होत्या. ती चप्पल त्या काचावर लागली. त्यानंतर न्यायालयात हजर असलेल्या पोलिसांनी लगेच हंबर्डेला ताब्यात घेतले. चप्पल फेक प्रकरणात आरोपी हंबर्डे याला तातडीने सहा महिन्यांची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. एकूणच या प्रकरणामुळे न्यायालय परिसरात मात्र खळबळ उडाली होती.