नांदेड: आज सकाळी घरासमोरील गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा उपचारादरम्यान दुपारी १ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बियाणी यांच्या शारदा नगर येथील घरासमोर दोघांनी गोळीबार केला. गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर शहरातील एका एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते
मागीलवर्षी मोठ्या शिताफीने वाचवला होता जीव संजय बियाणी हे नांदेडमधले मोठे प्रस्थ असून खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, मागील वर्षी बियाणी यांना खंडणी साठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून कुप्रसिद्ध गुंड रिंधाच्या नावे त्यांना खंडणी मागण्यात आली होती. तेव्हा मोठ्या शिताफीने बियाणी यांनी, मी बियाणी नसल्याचे सांगून मोठ्या शिताफीने हल्ला परतवून लावला होता. त्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचा सुरक्षा रक्षक काढण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांच्यावर घरासमोरच हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये तणावाचे वातावरणनांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून गोळीबाराच्या घटना आता अगदीच सामान्य होत चालल्या आहेत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आजच्या या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरली आहे. दरम्यान, शहरातील आनंदनगर भागात समर्थकांनी बंद पाळत हत्येचा निषेध केलाय. काहींनी दुकानावर दगडफेक केली, त्यात एका दुकानाचे मोठे नुकसान झालेय. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या या घटनेनंतर नांदेडमध्ये चांगलाच तणाव पसरलाय. शहरातील अनेक भागात या हत्येच्या निषेधार्थ व्यापाऱ्यानी दुकाने बंद ठेवली आहेत.