देगलूर (जि़नांदेड) : देगलूर महाविद्यालयातील (कनिष्ठ) शाखेचे पर्यवेक्षक प्रा. विजयकुमार कुमठेकर यांना नांदेड शहरातील एकाही दवाखान्यात बेड उपलब्ध न झाल्याने औरंगाबाद येथे हलविण्याचा प्रयत्न झाला़ मात्र, औरंगाबादला पोहोचण्यापूर्वीच त्यांचे रस्त्यातच निधन झाले़
देगलूर येथे करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये कुमठेकर कोरोनाबाधित आढळले होते. सोमवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना प्रकृती चिंताजनक झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना नांदेड येथे हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, नांदेड येथे बेड उपलब्ध होऊ शकला नाही़ कुमठेकर यांची औरंगाबाद सासरवाडी असल्याने त्या माध्यमातून त्यांनी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात संपर्क केला.
या रुग्णालयातून बेड उपलब्ध असल्याचा निरोप आल्यानंतर सोमवारी रात्री आठ वाजता विजयकुमार कुमठेकर व त्यांचे कुटुंबीय औरंगाबादकडे रवाना झाले. मात्र, औरंगाबाद येथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला़ अहमदपूर तालुक्यातील कुमठा या गावचे रहिवासी विजयकुमार कुमठेकर हे नोकरी निमित्ताने देगलूर येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.