नांदेड : किनवट-माहूर रस्त्यावरील वडूलीफाटा येथील एस. टी. निवाऱ्यामागील जंगल भागात पित्यासह दहा वर्षीय मुलगा आणि बारा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाशेजारीच विषारी द्रव्याचा डबा सापडल्याने हा सामूदायिक आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असला तरी मुलाची जीभ बाहेर आलेली असल्याने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करुन त्यानंतर विष पाजले असावे, असा संशयही व्यक्त होत आहे.
किनवट-माहूर रस्त्यावर वडूलीफाटा आहे. या फाट्यावर एस. टी. थांब्याचा निवाराशेड आहे. या शेडमागील वन भागात संतोष चव्हाण या इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याच्यापासून काही अंतरावर त्याच्याच दहा वर्षीय मुलाचा आणि बारा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला.
घटनेची माहिती तेथील काहींना समजल्यानंतर त्यांनी तातडीने किनवटसह माहूर पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी ए. डी. जहारवाल हेही घटनास्थळाकडे रवाना झाले.
पत्नी सोडून गेल्याने होता तणावात प्राप्त माहितीनुसार संतोष चव्हाण हा मूळचा विदर्भातील साखरा या गावचा रहिवासी असून १५ वर्षांपूर्वी तो या भागातील रामूनाईकतांडा येथे मजुरीसाठी आला होता. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी याच भागात तो राहू लागला. महिनाभरापूर्वी त्याची पत्नी संतोष यास सोडून गेली होती. या तणावातूनच संतोष चव्हाण याने स्वत:सह मुलांना विष पाजून मारले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर राजगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. काळे शवविच्छेदनासाठी घटनास्थळाकडे रवाना झाले असून तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.