नांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय या बँकेत खाते आहे. आयडीबीआयमधील या खात्यातून हॅकर्सने एक महिन्याच्या काळात अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये काही व्यक्तींच्या खात्यावर वळते करून बँकेला चुना लावला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी सहकारी बँकेने वजिराबाद पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नवीन मोंढा भागातील शंकर नागरी सहकारी बँकेत अनेक व्यापारी, अडते यांची खाती आहेत. या बँकेचे वजिराबाद भागातील आयडीबीआय या बँकेत ०५००१०२००००१८९५७ या क्रमांकाचे खाते आहे. या खात्यातून २ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ या एक महिन्याच्या काळात अंदाजे १४ कोटी ५० लाख रुपये काही जणांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. ही सर्व रक्कम एनएफटी आणि आरटीजीएसद्वारे वळविली आहे. शंकर नागरी सहकारी बँकेने २ जानेवारी रोजी आपले खाते तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात शंकर नागरी सहकारी बँकेने वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात तूर्त आयडीबीआय बँकेकडून मात्र कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून करण्यात येणार आहे. नांदेडात एखाद्या बँकेचे खाते हॅक करून त्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम वळती करण्याचा बहुधा हा पहिलाच प्रकार असण्याची शक्यता आहे.
आपल्या खात्यातील रक्कम सुरक्षितशंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेले खाते काही अज्ञात लोकांनी हॅक केले आहे. ही जबाबदारी आयडीबीआय बँकेची आहे. खातेदारांचे आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. ग्राहकांनी काळजी करू नये, असे आवाहन बँकेचे चेअरमन माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम राजे यांनी केले आहे.