नांदेड - लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधात बुरशी आढळ्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आलाय. हिमायतनगर तालुक्यातील सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रावर ही घटना घडली.
एका 2 वर्षाच्या बालकास जुलाब लागल्याने हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते... तेथील डॉक्टरानी बाळासाठी मेट्रोनिडाझोल हे औषध दिले. सुदैवाने बाळाला हे औषध पाजण्यापुर्वीच त्यात आळयाप्रमाणे दिसणारी बुरशी आढळून आली. यानंतर तात्काळ पालकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क केला. डॉक्टरांनी हे औषध ठेऊन घेऊन दूसरे औषध दिले. पण नजरचुकीने हे औषध बाळाला पाजले गेले असते तर बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असता.
औषधात बुरशी आढळल्याचे आरोग्य अधिकारी राठोड यांनी मान्य केले. या धक्कादायक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे यांना या गंभीर प्रकाराची काहीही माहिती नव्हती. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकद चव्हाटयावर आला आहे.