नांदेड : स्वातंत्र्य सैनिकाचे रक्ताचे नातेवाईक असल्याचे बनावट कागदपत्र तयार करुन शासकीय नोकरी मिळवल्या प्रकरणी हिंगोली येथील सा.बां.वि.चे अभियंता हनुमंत गोविंदराव शिरसाठ यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिरसाठ यांनी १८ सप्टेंबर १९९२ रोजी स्वातंत्र्य सैनिक रामा दुधवाड यांचे रक्ताचे नातेवाईक म्हणजेच भाचा असल्याचे बनावट कागदपत्र तयार केले. या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी २६ वर्षापासून सेवाही बजावली आहे. या प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रारंभी हे प्रकरण चौकशीवरच ठेवण्यात आले. मात्र सदर प्रकरणात शासन आदेशानुसार स्वातंत्र्य सैनिकाच्या जवळच्या एका नातेवाईकास सवलतीचा फायदा घेता येतो.
परंतु ते स्वातंत्र्य सैनिकाचे रक्ताचे नातेवाईक असल्यास शासन नियमाप्रमाणे लाभ मिळवण्यास पात्र ठरतात. मात्र हनमंत शिरसाठ हे दुधवाड यांच्या जातीचेही नसल्याचे पुढे आले आहे. स्वातंत्र्य सैनिक रामा दुधवाड हे कोळी महादेव या जातीचे आहेत. तर शिरसाठ हे मराठा जातीचे असल्याने शासकीय सेवेतील अभिलेखानुसार तो खुल्या प्रवर्गात येतो. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिक दुधवाड यांच्याशी शिरसाठ यांचे कोणतेही रक्ताचे संबंध नसताना त्यांनी खोटे कागदपत्र सादर करुन ते खरे असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता शेख जाकीर शेख सगीर यांनी केली. या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.