मुखेड ( जि.नांदेड ) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डातील एका रुग्णाच्या नातेवाइकाने डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ( दि.२० ) सायंकाळी ५ च्या सुमारास घडला होता. याप्रकरणी मुखेड पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब मष्णाजी गायकवाड ( २५, रा.गणेश नगर, मुखेड ) यास अटक केली असून न्यायालयाने जामीन नाकारून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब मष्णाजी गायकवाड याचे नातेवाईक येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात उपचार घेत आहेत. मंगळवारी सायंकाळी भाऊसाहेब रुग्णाला भेटण्यासाठी आला होता. यावेळी तो इतर रुग्णांच्या नातेवाईकांसोबत वाद घालून शिविगाळ करत होता. त्यावेळी वार्डातिल वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत राहण्यास सांगिलते. यामुळे संतापलेल्या भाऊसाहेब याने कर्तव्यावरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर धावून जात चाकूने हल्ला केला. प्रसंगावधान राखून उपस्थितांनी त्याला अडवले आणि पकडून ठेवले. यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर भाऊसाहेबने चाकूचा धाक दाखवून तेथून पळ काढला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक विलास गोबाडे, सहा.पो.नि.संतोष केंद्रे, पो.काॅ.गंगाधर चिंचोरे आदि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली. काही वेळाने पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून चाकू हस्तगत केला. विशेष म्हणजे आरोपी भाऊसाहेब याच्या विरोधात यापूर्वी सुद्धा शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील ब्रदर आदी विजय बनसोडे याने दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब गायकवाड यांच्या विरोधात कलम ३५३,५०४,५०६ भादवी कलम ४,२५ भारतिय हत्यार कायदा अंतर्गत मुखेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब यास मुखेड न्यायालयात हजर केले. नायायाल्याने त्याचा जामिन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.संतोष केंद्रे हे करत आहेत.