किनवट : तालुक्यातील डोंगर माथ्यावर असलेल्या शिवशक्तीनगर घोगरवाडी या आदिवासी वस्तीला अद्याप पक्का रस्ता नाही. यामुळे येथील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यासाठी चक्क बैलगाडीत टाकून दोन किलोमीटरवरील मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागले. त्यानंतर तिथे आलेल्या रुग्णवाहिकेतून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ( दि. २६) सकाळी घडला. कोलाम आदिम आदिवासी जमात असलेल्या या वस्तीचा खडतर प्रवास कधी संपणार ? असा सवाल आदिवासी बांधव करत आहेत
घोगरवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या शिवशक्तीनगर येथील सुनिता दशरथ मडावी या गर्भवतीला मंगळवारी सकाळी प्रसववेदना सुरू झाल्या. तेंव्हा त्यांनी रुग्णवाहिकेला बोलावले, त्यानंतर बोधडी पीएचशीची रुग्णवाहिका आली. मात्र गावाला पक्का रस्ता नसल्याने मुख्यरस्त्यावरच रुग्णवाहिका थांबली. यामुळे गर्भवतीला एका बैलगाडीत बसवून जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने घोगरवाडी मांडवा या पक्क्या रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणापर्यंत नेण्यात आला. येथून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयापर्यंतचा गर्भावतीचा प्रवास रुग्णवाहिकेत झाला.
वन अधिनियमाच्या अगोदर वसलेल्या वस्त्यांच्या रस्त्याला वनविभागाने अटकाव का करावा ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन मुंडे यांनी केला आहे. यापूर्वीही अनेक आजारी व्यक्तींना, गर्भवती महिलांना कधी बाजेवर तर कधी बैलगाडीतून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागले आहे. याबाबत लोकमतने गेली कित्येक वर्षांपासून वृतांच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. मात्र, वन विभागाच्या काही अटींमुळे हा प्रश्न मार्गी लागत नाही. गर्भवतीस रुग्णालयात पोहचवण्यासाठी दत्ता आडे, आरोग्य कर्मचारी अमृत तिरमनवार यांनी मदत केली.