नांदेड : शहरातील हनुमानगड ते पत्रकार कॉलनी रस्त्यावर उभ्या असलेल्या २२ चारचाकी वाहनाच्या काचा अज्ञातांनी फाेडल्या, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.घटनास्थळी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, उपाधीक्षक सुरज गुरव यांनी धाव घेऊन पाहणी केली. या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीची ओळख पटविण्यात येत आहे.
हनुमानगड येथील हनुमान मंदिरापासून जवळच रात्रीच्या वेळी अनेक नागरिकांनी घरासमोर आपल्या चार चाकी गाड्या लावल्या होत्या. मध्यरात्री पल्सर कंपनीच्या दोन दुचाकीवरून भरधाव वेगाने तिघे जण या परिसरातून जात होते. यावेळी त्यांनी चारचाकी वाहनांवर दगडफेक केली. या भागातील जवळपास २२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कार चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी दहशत पसरविण्यासाठी हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. दरम्यान, पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन केली आहेत.