नांदेड : 'विना'मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरूध्द कारवाई करीत असताना एका दुचाकी चालकाने दगड फेकून मारल्याने चुडावा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गंभीर जखमी झाले आहेत. प्रभाकर निवृत्तीराव कच्छवे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कच्छवे यांच्यावर सध्या नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी जिल्ह्यातील चूडावा येथे आज सकाळी विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई सुरु होती. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सैदाणे व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी वसमत फाटा परिसरात नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यांनी कोरोनानियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई सुरु केली. त्याचवेळी, चुडावा येथील रहिवासी असलेला एका दुचाकीस्वार विनामास्क तेथून जात होता. त्यास पोलिसांनी कारवाईसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांना न जुमानता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसांवर दगडफेक केली. यात पो.कॉ. प्रभाकर कच्छवे यांच्या डोक्यास दगड लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पोलिसांनी लागलीच रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार केले. सद्या त्यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.