नांदेड : नांदेड शहरातील आयटीआय चाैक ते अण्णा भाऊ साठे चाैक या रस्त्याच्या दुभाजकात लावलेले वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न असून, या झाडांना मनपा व सचखंड गुरुद्वाराद्वारे पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे ही झाडे बहरली आहेत.
रस्त्यावर खड्डे
नांदेड : नवीन नांदेड भागातील काैठ्यातील मुख्य रस्ता असलेला पोलीस चाैकी ते जुना काैठा पूल हा रस्ता नादुरुस्त झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी चेंबर्सची झाकणे रस्त्यापेक्षा वर आल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदरील रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
रस्त्यावर अतिक्रमण
नांदेड : जुन्या नांदेडातील चाैफाळा ते जुना मोंढा या रस्त्यावर किरकोळ व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांनाही मार्ग काढण्यास अडचण होत आहे. फुटपाथ तर या भागात रिकामे राहिलेच नाहीत. मनपा पथकाने या भागात मोहीम राबविण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.
मार्गदर्शन अभियान
नांदेड : ऑल इंडिया तन्जीमे इन्साफच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सुविधा व्हावी यासाठी ईडब्ल्यूएस मार्गदर्शन तसेच नोंदणी अभियान राबविण्यात येत असून, शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात हे अभियान राबविण्यात आल्याची माहिती ऑल इंडिया तन्जीमे इन्साफचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांनी दिली.
शहरातील विविध महाविद्यालयांत जाऊन ईडब्ल्यूएसबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांची नोंदणी करून प्रमाणपत्रदेखील काढून देण्यात येत आहे.
बक्षीस वितरण
नांदेड : नांदेड चाईल्ड लाईनच्या वतीने चाईल्ड लाईन से दोस्ती या सप्ताहाअंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सुमन मुलींचे बालगृहात बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, ॲड. गणेशलाल जोशी, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, अनिल दिनकर, आदी उपस्थित होते.