अर्धापूर - तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या समस्यांचे शासनाने निराकरण करावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाने नवीन योजना काढावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर तालुकाध्यक्ष कोंडीबा लोणे, सरपंच संजय लोणे, दीपक लोणे, सुरेश लोणे, गंगाधर वाहुळकर आदींच्या सह्या आहेत.
मुक्रमाबाद परिसरात विजांसह पाऊस
मुक्रमाबाद- मुखेड तालुक्यातील मुक्रमाबादसह परतपूर, देगाव, इटग्याळ, गोजेगाव, रावणकोळा, सावरमाळ, मुक्रमाबाद, बंटगीर, रावी, हंगरगा, लखमापूर, कोटग्याळ, आंदेगाव आदी गावात शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून तासभर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरठवा खंडित झाला होता. या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले.
कुंडलवाडीत पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’
कुंडलवाडी- शहर व परिसरातील खेड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात ८ ते १२ मे दरम्यान कडक ‘जनता कर्फ्यू’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात ६ मे रोजी नगरपालिका सभागृहात नगरपालिका प्रशासन व व्यापारी संघटनेच्या एका बैठकीत हा निर्णय घेतला. आजपर्यंत शहरात १७८ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असून, काहीजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
फुलवळ परिसरात पाऊस
फुलवळ- फुलवळ परिसरात शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. रब्बी हंगामातील उन्हाळी ज्वारी, भुईमूग व भाजीपाला पिके काढणीला आली आहेत. त्यातच अवकाळी पावसाने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा काही वेळ खंडित झाला होता.
प्रवशांची गैरसोय
किनवट- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दोन दिवसांपूर्वी ११ गाड्या बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोरोनामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या घटली असली, तरी बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी रेल्वेचा पर्यायी प्रवास करता येत होता. मात्र रेल्वे प्रशासनाने अचानक ११ रेल्वे बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
आचाऱ्यांवर उपासमार
अर्धापूर - कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्नसोहळे ठप्प आहेत. त्यामुळे आचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील दोन महिन्यांपासून एक रुपयाचेही उत्पन्न झाले नसल्याचे आचाऱ्यांनी सांगितले. शासनाने आचाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
धान्याचे कीट वाटप
किनवट- येथील साईबाबा संस्थान, किनवटच्यावतीने गोरगरीब नागरिक तसेच रेल्वेस्टेशन व बसस्थानक आदी ठिकाणी थांबलेल्या लोकांना धान्याचे कीट वाटप करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. १०१ गरजुंनी याचा लाभ घेतला. यापुढेही हे कार्य सुरू राहील, अशी माहिती पवार गुरूस्वामी यांनी दिली.
खासगी कर्ज वसुली थांबवा
कुंडलवाडी- बिलोली तालुक्यात व कुंडलवाडी शहरात मायक्रो फायनान्स व इतर शासकीय निमशासकीय तथा खासगी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी धमकीवजा भाषेचा वापर करीत आहेत. त्यामुळे कर्जधारक अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे अगोदरच लोक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. .
मत्स्य व्यवसाय ठप्प
कंधार- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय ठप्प झाला असूनल मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या व्यवसायातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मासे व्यवसाय चालतो. मात्र कोरोनामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण
भोकर - तालुक्यातील बोरवाडी येथे ५ मे राेजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी आनंदराव वानोळे, डॉ. किशोर पाटील, डॉ. हरोड, प्रकाश चांडोळकर, पार्वतीबाई वागतकर, शेषराव पाटील आदी उपस्थित होते.
जांभळे दाखल
लोहा- शहरातील बाजारपेठेत जांभूळ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात साधारण जांभूळ विक्रीसाठी येतात. सध्या जांभूळ २०० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.
आरक्षण देण्याची मागणी
हदगाव - मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयाविरोधात गुरुवारी हदगावात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्यावतीने राज्य व केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. हदगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
चढ्या दराने विक्री
देगलूर - येथील काही व्यापारी जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी आहेत. हनुमान मंदिर परिसर, कापड बाजार, जुने बसस्थानक, मशनरी लाईन गल्ली आदी ठिकाणी व्यावसायिक जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करत आहेत.
भाजपचे आंदोलन
हिमायतनगर- पश्चिम बंगाल येथील घटनेच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने ६ मे रोजी तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष खंडू चव्हाण, सुधाकर पाटील, राम सूर्यवंशी, परमेश्वर सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
चित्रकला स्पर्धेचे बक्षीस
किनवट- गोकुंदा येथील महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या एसबीएनजी ग्रुपने आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण कला शिक्षक शिवराज बामणीकर यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेत मयुरी लोंढे, राजेश मस्के, कीर्ती बंडेवार, स्वरूपा कांबळे यांनी यश मिळविले
गोविंद पवार यांना पदोन्नती
धर्माबाद- येथील पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गोविंद पवार यांची जमादार म्हणून पदोन्नती झाली. बुधवारी पोलीस उपअधीक्षक विक्रम गायकवाड, पोनि. सोहम माछरे यांनी पदेान्नती झाल्याचे फित लावून पवार यांचा सत्कार केला.